पाकविरोधात देशभर संताप
By admin | Published: May 3, 2017 04:41 AM2017-05-03T04:41:09+5:302017-05-03T04:42:31+5:30
दोन जवानांचा शिरच्छेद करून विटंबना करणाऱ्या पाकिस्तानविरोधात देशभरात संताप असून, भारताने पाकला फोन करून
नवी दिल्ली : दोन जवानांचा शिरच्छेद करून विटंबना करणाऱ्या पाकिस्तानविरोधात देशभरात संताप असून, भारताने पाकला फोन करून खडसावले आहे. एका जवानाच्या मुलीने माझ्या पित्याच्या बलिदानाच्या मोबदल्यात ५० जणांचा बळी मला हवा आहे, असे म्हटले आहे. आम्ही योग्य वेळी आणि आम्ही निवडू त्या जागी उत्तर देऊ, असा इशारा भारतीय लष्कराने मंगळवारी दिला.
भारताच्या मिलिटरी आॅपरेशन्सच्या महासंचालकांनी पाकचे हे कृत्य अमानवी व भ्याड असल्याचे म्हटले आहे. शिवाय याचा जाबही विचारला आहे. या शिरच्छेद कृत्याच्या निषेधार्थ पूंछ आणि जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानविरोधात निदर्शने झाली. पाकिस्तानच्या लष्कराने रॉकेट आणि तोफांचा जोरदार मारा करून निर्माण केलेल्या संरक्षणात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बीएटी) सोमवारी नियंत्रण रेषेकडून जम्मूच्या पूंछ विभागात २५० मीटर आतमध्ये प्रवेश करून परमजीत सिंग व प्रेम सागर यांची हत्या करून शिरच्छेद केले. या राक्षसी कृत्याबद्दल भारतीय लष्कराने ‘योग्य’ ते उत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
शोकमय वातावरणात २२ व्या शीख इन्फन्ट्रीचे नायब सुभेदार परमजीत सिंग (४२) यांच्या पार्थिवाला लष्करी सन्मानात त्यांचे मूळ गाव वैनपोईन (पंजाब) येथे अग्नी दिला. परमजित सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुमारे ४५ हजार लोक उपस्थित होते. परमजित सिंग यांची पत्नी परमजित कौर यांनी जेव्हा पतीचे शिरविरहीत धड बघितले त्यावेळी त्यांनी या कृत्याबद्दल पाकला जशासतसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
पूर्णवेळ संरक्षणमंत्री नसल्याचा परिणाम - सिब्बल
काँग्रेसने देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी सरकारकडे कोणतेही धोरण नाही, अशी टीका मंगळवारी केली. पक्षाचे प्रवक्ते कपिल सिब्बल म्हणाले की, दोन जवानांचा पाकिस्तानचे लष्कर आमच्या हद्दीत येऊन शिरच्छेद करीत असताना भाजपा दिल्ली महापालिका निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी ‘विजयपर्व’ आयोजित करते हे लांच्छनास्पद आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भारतीय जवानांचा शिरच्छेद झाल्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या देऊ केल्या होत्या याची आठवण करून दिली. पूर्णवेळ संरक्षणमंत्री असल्याशिवाय परिणामकारक काम होत नाही, असेही सिब्बल म्हटले. सध्या अर्र्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी दिलेली आहे.
पाकिस्तानकडे निषेध
जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन जवानांचा शिरच्छेद केल्याबद्दल भारतीय लष्कराने मंगळवारी पाकिस्तानच्या लष्कराकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. पाकिस्तानच्या समपदस्थांशी या विषयावर बोलले व त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. जेथे या दोन जवानांचा शिरच्छेद करण्यात आला त्या भागात पाकिस्तानच्या लष्कराने गोळीबार करून पूर्ण संरक्षण दिले होते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘एलओसी’लगत २० नवीन अड्डे
भारतीय लष्कराने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकव्यात काश्मीरस्थित ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढला असून, जवळपास दहशतवादी संघटनांनी २० नवीन अड्डे उभारले आहेत, अशी माहिती भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला अगदी खेटून आधीपासून काही अड्डे अस्तित्वात असून, नवीन अड्ड्यांसह दहशतवाद्यांच्या एकूण अड्ड्यांची संख्या ३५ ते ५५ च्या घरात पोहोचली आहे. हे सर्व अड्डे भारतविरोधी दहशतवादी कारवायांत सक्रिय आहेत.
सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर (४५) यांचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी टकेनपूर (जिल्हा देवरिया) या त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी दिल्लीत आणण्यात आले. या दिवंगत जवानांचे कुटुंबीय आणि मित्रांनी लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी इच्छा व्यक्त केली.
प्रेम सागर यांची कन्या सरोज म्हणाली की, ‘‘माझे वडील हुतात्मा झाले. माझ्या वडिलांच्या एका डोक्यासाठी ५० डोकी हवीत अशी माझी मागणी आहे.’’ वैनपोईन गावात ‘शहीद परमजित अमर रहे’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या गेल्या. पंजाबमध्ये काही ठिकाणी पाकिस्तानचा ध्वजही जाळण्यात आला.