फेसबुक लाईव्हवर दाम्पत्याने प्यायले विष, पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर; हे आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:38 PM2022-02-09T16:38:21+5:302022-02-09T16:38:30+5:30
दाम्पत्याचा आवाज ऐकून शेजारील व्यक्तीने पती-पत्नीला रुग्णालयात नेले, पण पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे.
बागपत: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एका चप्पल व्यापाऱ्याने फेसबूक लाइव्हवर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यादरम्यान त्या व्यक्तीच्या पत्नीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर पत्नीनेही विष प्राशन केले आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. सध्या त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बरौतच्या कासिमपूर खेडी गावात राहणारे राजीव तोमर हे गेल्या 5 वर्षांपासून पत्नी पूनम आणि दोन मुले विपुल आणि रिदम यांच्यासह सुभाष नगरमध्ये राहतात. त्यांचे बाओली रोडवर चपलांचे दुकान आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या व्यवसायात मंदी होती. खर्च भागविण्यासाठी शेजारील दुकानदारांकडून कर्ज घ्यावे लागले होते. पण, कर्ज फेडता न आल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
राजीव तोमर यांनी फेसबुक लाईव्हवर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना विष खाताना पाहून त्यांच्या पत्नीने त्यांना अडवण्याचा आणि विषाची पुडी हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत राजीव यांनी विष खाल्ले होते. यानंतर पत्नीनेही त्या पुडीतले उरलेले विष प्राशन केले. दरम्यान, त्या दोघांचा आवाज ऐकून जवळच्या दुकानदारांनी पती-पत्नीला रुग्णालयात नेले. पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.