प्रसूतीनंतर रुग्णालयानं दिलं ३५ हजारांचं बिल; पैसे नसल्यानं दाम्पत्यानं नवजात अर्भक विकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 08:59 AM2020-09-01T08:59:46+5:302020-09-01T09:03:24+5:30
रुग्णालयानं कागदपत्रांवर अंगठा घेऊन १ लाख रुपयांना खरेदी केलं नवजात अर्भक
आग्रा: रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्यानं नवजात अर्भक विकण्याची वेळ एका आईवर आली. रुग्णालयात गेलेल्या महिलेची सिझरिंगद्वारे प्रसूती करण्यात आली. बबिता असं या महिलेचं नाव आहे. बबिताला डिस्चार्ज देताना रुग्णालयानं ३५ हजारांचं बिल दिलं. बबिताचा पती शिवचरणकडे रुग्णालयाचं बिल देण्यासाठी पैसे नव्हते. बिल भरण्यासाठी नवजात अर्भक एक लाख रुपयांना विका, असं रुग्णालयानं आपल्याला सांगितल्याचा आरोप दाम्पत्यानं केला.
बबिता आणि शिवचरण यांचं हे पाचवं अपत्य आहे. ते उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यातल्या शंभू नगर येथे एका भाड्याच्या खोलीत राहतात. रिक्षा चालवून शिवचरण यांना दररोज १०० रुपये मिळतात. तेही रोज मिळतील की नाही याची शाश्वती नसते. त्यांचा सर्वात मोठा मुलगा १८ वर्षांचा आहे. तो एका बुटांच्या कंपनीत काम करतो. लॉकडाऊनमुळे त्याचा कारखाना बंद झाला. त्यामुळे त्याच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली.
मी जिवंत आहे! नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार; पोलीस करत होते हत्येचा तपास, ‘ती’पुन्हा परतली
मोफत प्रसूती करू असं एका आशा सेविकेनं आपल्याला सांगितलं होतं अशी माहिती बबितानं दिली. 'आमचं नाव आयुष्यमान भारत योजनेत नाही. मात्र प्रसूती मोफत होईल, असं आशा सेविकेनं म्हटलं होतं. बबिताला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली असं सांगण्यात आलं. २४ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी तिनं एका मुलाला जन्म दिला,' असं शिवचरण यांनी सांगितलं.
बापरे! अचानक गेली वीज, तब्बल 20 तास ट्रेनमध्ये अडकले हजारो प्रवासी
रुग्णालयानं आम्हाला ३५ हजारांचं बिल देण्यास सांगितलं. मी आणि माझी पत्नी निरक्षर आहे. आम्हाला लिहिता वाचता येत नाही. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी काही कागदपत्रांवर आमचा अंगठा घेतला. आम्हाला डिस्चार्ज पेपर देण्यात आले नाहीत. त्यांनी आमच्या बाळाला एक लाख रुपयात खरेदी केलं, अशा शब्दांत शिवचरण यांनी त्यांची व्यथा मांडली.