मुंबईला जात असलेलं प्रेमी युगुल रेल्वेच्या टॉयलेटमध्ये सापडलं; पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:01 PM2023-03-19T20:01:37+5:302023-03-19T20:02:06+5:30
बिहारच्या दानापूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.
दानापूर : बिहारच्या दानापूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे रेल्वेच्या टॉयलेटमध्ये एक प्रेमी युगुल सापडल्याने एकच खळबळ माजली. आसाममधून पळून आलेल्या या प्रेमी युगुलाला बिहारच्या आरा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात जीआरपी पोलिसांना यश आले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रेमी युगुलांना आसाम पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
खरं तर हे दोघेही 14 मार्च रोजी घरातून पळून गेले आणि आसामच्या दिब्रुगड स्टेशनवर पोहोचले. तिथून ते दिब्रुगड-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झाले. मुलीच्या वडिलांनी आसाममधील लुमडिंग पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाशी संबंधित एफआयआर दाखल केला. यानंतर आसाम पोलिसांनी कारवाई सुरू केली.
शाळेत जात असताना विद्यार्थिनीचे चालकावर जडलं प्रेम
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दास असे या प्रियकर तरुणाचे नाव असून, तो आसाममधील होजई जिल्ह्यातील लुमडिंग पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. तो पेशाने एक ड्रायव्हर आहे. संबंधित तरुण आणि तरुणीचे घर जवळच आहे. मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून तरुण तरुणीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. शाळेत जात असताना तरुणाची नजर त्या मुलीवर पडली. यानंतर तो अनेक दिवस मुलीच्या मागे लागला.
अनेक महिने सुरू होते प्रेमप्रकरण
सर्वप्रथम तरुणाने मैत्री करण्यासाठी आपला मोबाईल नंबर तरुणीला दिला आणि त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. मोबाईलवर बोलत असताना संजयने प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मुलगी घरून शाळेत जायची तेव्हा वाटेत तरुण तिला भेटायचा. हे असे सुरू असतानाच त्या दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
मुलीच्या कुटुंबीयांकडून गुन्हा दाखल
ठरल्याप्रमाणे दोघेही 14 मार्चला आसामच्या दिब्रुगड स्टेशनवर पोहोचले. मुलगी फिरायला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणींकडे देखील चौकशी केली. तपासादरम्यान संजयने त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचे कुटुंबीयांना समजले. मुलीच्या नातेवाईकांनी लुमडिंग पोलीस ठाण्यात संजय दासविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल केला.
प्रेमी युगुलाची आसामहून मुंबईकडे धाव
एकिकडे मुलीच्या घरचे तिला सर्वदूर शोधत होते तर हे दोघे ट्रेनमध्ये बसून मुंबईला निघाले होते. प्रेमी युगुलाच्या शोधासाठी तीन सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती. पाटणा, दानापूर, आरामार्गे मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघे असल्याची माहिती मिळाली. यानंतर लुमडिंग पोलीस स्टेशनच्या एसएचओने बिहार पोलिसांना याबाबात माहिती दिली.
पोलिसांना पाहून ट्रेनच्या टॉयलेटमध्ये लपले
ट्रेन आरा येथे पोहोचल्यावर जीआरपीने डब्बे तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाहताच प्रेमी युगुल टॉयलेटमध्ये लपले. मात्र, शौचालयात लपलेल्या दोघांना जीआरपीने पकडले. लुमडिंग पोलिसांनी सांगितले की, तरुण मंगळवारी तरुणीला घेऊन पळून गेला होता. मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर तातडीने कारवाई करत दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीही हा तरुण एका मुलीसह पळून गेला होता, असे पोलिसांनी अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"