या जोडप्यांच्या रोमान्सने पोलिसांना फोडलाय घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 12:04 PM2018-10-01T12:04:14+5:302018-10-01T12:07:55+5:30
कुटुंबीयांपासून दूर सेफ होममधील एकांतामध्ये जोडप्यांच्या रोमँटिक चाळ्यांमुळे तेथे संरक्षणासाठी तैनात पोलिसांना मात्र अवघडल्यासारखे वाटत आहे.
चंदिगड - हरियाणामध्ये घरातून पळून लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या सेफ होमच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांना सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. कुटुंबीयांपासून दूर सेफ होममधील एकांतामध्ये जोडप्यांच्या रोमँटिक चाळ्यांमुळे तेथे संरक्षणासाठी तैनात पोलिसांना मात्र अवघडल्यासारखे वाटत आहे. या जोडप्यांचे चाळे हे हनिमुनसारखे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर पोलिस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप येथील जोडप्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानातील एका प्रेमी युगुलाने घरातून पळून कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात हरियाणातील हिसार येथे विवाह केला होता. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना सेफ होममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तिथे एसएसओंनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळताना एचएसओ बिमला देवी यांनी सेफ होममध्ये राहत असलेल्या चार जोडप्यांपैकी एका जोडप्याचे वर्तन हे हनिमुनला आल्यासारखे असल्याने त्यांना खडसावल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फतेहाबादचे एसपी दीपक सहारन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून डीएसपी (एचक्यू) जगदीश कुमार चौकशी करत आहेत. मात्र या चौकशीबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
मात्र दुसरीकडे सेफ होममधीली जो़डप्यांच्या रोमँटिक वागण्यामुळे त्रास होत असल्याचे विविध ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. हिसारमधील सेफ होमच्या प्रभारी राजरानी यांनी सांगितले की, घरातील खोल्या आणि वॉशरूममध्ये या जोडप्यांकडून चाळे सुरू होतात. त्यामुळे शिष्टाचार पाळण्यासाठी त्यांना समजवावे लागते. जिंदमधील पोलीस कर्मचाऱ्यांनीही प्रेमी जोडप्यांपासून निर्माण होत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. यातील अनेक जोडपी अनुभवाने अपरिपक्व असतात, त्यामुळे मर्यादा पाळण्याबाबत त्यांना वारंवार समजवावे लागते, असे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.