राजघराण्यातील २० हजार कोटींच्या संपत्तीच्या वादावर ३० वर्षांनी पडदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:15 AM2020-06-16T03:15:15+5:302020-06-16T06:43:56+5:30
फरिदकोट महाराजांचे मृत्यूपत्र बनावट; सर्व संपत्ती दोन मुलींना
चंदीगड : पंजाबमधूल पूर्वीच्या फरिदकोट संस्थानाचे शेवटचे महाराज कर्नल हरिंदरसिंग ब्रार यांचे सुमारे ३० वर्षांपूर्वी उघड करण्यात आलेले कथित मृत्यूपत्र तद्दन बनावट असल्याचा निर्वाळा देत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिवंगत महाराजांची सर्व संपत्ती त्यांच्या दोन मुली व पुतण्याला त्यांच्या हिश्श्यानुसार वाटून देण्याचा आदेश दिला आहे. स्थावर व जंगम मिळून ही संपत्ती सुमारे २० हजार कोटी रुपयांची असावी, असा अंदाज आहे.
महाराज हरिंदरसिंग ब्रार यांचे १६ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर चार दिवसांनी २० ऑक्टोबर रोजी मोतीमहाल किल्ल्यामध्ये झालेल्या बैठकीत महाराजांनी १ जून १९८२ रोजी केलेले कथित मृत्यूपत्र वाचून दाखविण्यात आले. त्या मृत्यूपत्रानुसार महाराजांनी त्यांच्या सर्व संपत्तीचा मेहरवाल खेवाजी ट्रस्ट नावाचा ट्रस्ट स्थापन केला होता. ज्यांनी ते मृत्यूपत्र वाचून दाखविले होते ते सर्व या ट्रस्टचे व्यवस्थापक होते.
काय आहे नेमके प्रकरण?
महाराज हरिंदरसिंग वारले तेव्हा अमृत कौर, दीपिंदर कौर व महिपिंद्र कौर या त्यांच्या तीन मुली हयात होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा टिक्का हरमोहिंदरसिंग यांचे वडिलांच्या आधी सात वर्षांपूर्वी निधन झाले होते. महाराजांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नीही हयात होती; परंतु जाहीर केलेल्या त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या वारसांपैकी कोणालाही संपत्तीत वाटा दिला गेला नव्हता.
या मृत्यूपत्राविरोधात चंदीगडच्या जिल्हा न्यायालयात दोन दिवाणी दावे दाखल झाले. एक दावा राजकुमारी अमृत कौर यांनी वडिलांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीत दोन बहिणींसह आपल्याला एकतृतीयांश हिस्सा मिळावा यासाठी केला होता.
दुसरा दावा महाराजांचे बंधू कुंवर भरत इंदरसिंग यांनी केला होता. त्यांचे म्हणणे असे होते की, महाराजांच्या मृत्यूनंतर मागे राहिलेली संपत्ती ही त्यांची स्वअर्जित नव्हे, तर वडिलोपार्जित होती. महाराजांच्या पश्चात त्यांचा मुलगा नसल्याने कायद्यानुसार ही संपत्ती त्यांच्या दोन मुलींना नव्हे, तर भाऊ या नात्याने आपल्याला मिळायला हवी. हा दावा प्रलंबित असताना कुंवर भरत इंदरसिंग यांचे निधन झाल्याने तो पुढे त्यांचा मुलगा अनरेंद्रसिंग ब्रार यांनी चालविला.