सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं LOC ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण दोषी, 3 महिन्यांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 07:45 AM2017-10-26T07:45:49+5:302017-10-26T11:57:54+5:30
भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
नवी दिल्ली : भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. चंदू चव्हाण यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नियंत्रण रेषा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
2016 मध्ये सप्टेंबर महिन्यात भारतीय लष्कराकडून पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान 37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. 29 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिका-यांवर नाराज होऊन चंदू चव्हाण पाकिस्तानात गेले होते. मात्र, यानंतर भारतानं सर्वोतोपरी प्रयत्न करत त्यांना 21 जानेवारीला पुन्हा मायदेशी सुखरुप आणले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयानं चंदू चव्हाण यांनी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेवर अंतिम स्वरुपात शिक्कामोर्तब होणं अद्याप बाकी आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात चंदू चव्हाण अपीलदेखील करू शकतात.
कसे पोहोचले होते चंदू चव्हाण पाकिस्तानात?
28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केली. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली. यावर भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती.
21 जानेवारीला भारताकडे सोपवले
जवान चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. डॉ. भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. यास यश मिळून 21 जानेवारीला अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे चव्हाण यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: डॉ. भामरे या वेळी उपस्थित होते.