आवाजाचे नमुने घेण्यास कोर्टाची परवानगी नाही
By Admin | Published: February 26, 2016 03:47 AM2016-02-26T03:47:06+5:302016-02-26T03:47:06+5:30
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि पत्रकारांसह इतरांना मारहाण करताना कॅमेऱ्यात पकडल्या गेलेल्या तीन वकिलांविरुद्ध अवमाननेसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने
नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि पत्रकारांसह इतरांना मारहाण करताना कॅमेऱ्यात पकडल्या गेलेल्या तीन वकिलांविरुद्ध अवमाननेसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी करण्याला सहमती दर्शविली आहे. दरम्यान दिल्ली न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास पोलिसांना परवानगी नाकारली
आहे.
वकिलांवर कारवाईबाबत तातडीने सुनावणी करण्याची विनंती वकील प्रशांत भूषण आणि कामिनी जयस्वाल यांनी केल्यानंतर शुक्रवारी संबंधित खंडपीठासमक्ष सुनावणी केली जाईल, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्या. यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट
केले. पतियाळा न्यायालयातील १५ आणि १७ फेब्रुवारी रोजीच्या हिंसाचारप्रकरणी अन्य प्रलंबित याचिकेवर न्या. चेलामेश्वर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने १० मार्च रोजी सुनावणी निश्चित केल्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी करावी, असे भूषण यांनी म्हटले. विक्रमसिंग चौहान, यशपालसिंग आणि ओम शर्मा हे तीन वकील पत्रकारांना मारहाण करीत असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. न्यायालयाने स्वत:हून अवमानना कारवाई करावी तसेच पत्रकारांवरील हल्ल्याबाबत तपास चमूकडून तपास करण्याची अशी विनंती या याचिकेत केली होती.
रिमांडच्या काळात गोपनीयता...
महानगर दंडाधिकारी लव्हलीन यांनी गुरुवारी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोघांच्या आवाजांचे नमुने घेण्यास परवानगी नाकारली.
या दोघांनी २३ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर बुधवारी रात्री तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
रिमांडच्या सुनावणीबाबत गोपनीयता बाळगण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्यानंतर दक्षिण कॅम्पस पोलीस ठाण्यात तात्पुरता न्यायालयीन कक्ष उभारण्यात आला आहे.