"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:03 AM2024-11-28T02:03:14+5:302024-11-28T02:08:14+5:30
याप्रकरणी न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीसाठी 20 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे...
अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करत दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीसाठी 20 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. हे प्रकरण आता धार्मिक श्रद्धा आणि इतिहास यांच्यात वादाचे कारण बनू शकते. कारण अजमेर शरीफ दर्गा हे एक प्रमुख मुस्लिम धार्मिक स्थळ आहे. यासंदर्भात आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सुल्तान-ए-हिन्द ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती (RA) हे भारतातील मुस्लिमांचे सर्वात महत्वाच्या औलिया इकराम पैकी एक आहेत. शतकानुशतके लोक त्यांच्या चौकटीवर जातात आणि जात राहतील इंशाअल्लाह. अनेक राजे, महाराजे, शहेनशहा, आणि निघून गेले, मात्र ख्वाजा अजमेरी यांची चौकट आजही 'आबाद' आहे."
ओवेसी म्हणाले की, "1991 चा प्रार्थनास्थळ कायदा स्पष्टपणे सांगतो की, कुठल्याही प्रार्थनास्थळाची धार्मिक ओळख बदलसी जाऊ शकत नाही. तसेच, हिंदुत्ववादी संघटनांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी कायदा आणि संविधानाचे उल्लंघन केले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत, असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.