किशाेर बियाणी यांची मालमत्ता जप्त करा, न्यायालयाचा आदेश; ‘फ्यूचर-रिलायन्स’मधील व्यवहारही राेखला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:52 AM2021-03-19T02:52:08+5:302021-03-19T06:43:10+5:30
फ्यूचर आणि रिलायन्स समूहात गेल्यावर्षी २४ हजार ७१३ काेटींचा व्यवहार करार झाला हाेता. त्यास ‘ॲमेझाॅन’ने आक्षेप घेतला हाेता. ‘ॲमेझाॅन’ने सर्वप्रथम सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय लवादात धाव घेतली हाेती.
नवी दिल्ली: सिंगापूर येथील लवादाने दिलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे स्पष्ट करुन दिल्लीन्यायालयाने फ्यूचर समूहाचे अध्यक्ष किशाेर बियाणी व इतर संबंधितांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच फ्यूचर आणि रिलायन्समध्ये झालेल्या २४ हजार काेटींचा व्यवहार राेखण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
फ्यूचर आणि रिलायन्स समूहात गेल्यावर्षी २४ हजार ७१३ काेटींचा व्यवहार करार झाला हाेता. त्यास ‘ॲमेझाॅन’ने आक्षेप घेतला हाेता. ‘ॲमेझाॅन’ने सर्वप्रथम सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय लवादात धाव घेतली हाेती. लवादाने ऑक्टाेबर २०२०मध्ये ‘ॲमेझाॅन’च्या बाजूने निर्णय दिला हाेता. तरीही फ्यूचरने या व्यवहाराच्या पूर्ततेसाठी पावले उचलली. त्यानंतर ‘ॲमेझाॅन’ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्या. जे.आर. मिधा यांनी फ्यूचर समूहाचा दावा फेटाळून किशाेर बियाणी व इतर संबंधिताना २८ एप्रिल राेजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. त्यांना तीन महिने ताब्यात का घेऊ नये, अशीही नोटीसही बजावण्यात आली. लसीकरणासाठी पंतप्रधान मदत निधीत २० लाख रुपये जमा करण्याचेही निर्देश न्यायालयाने फ्यूचर समूहाच्या संचालकांना दिले आहेत.