उन्नाव बलात्कार प्रकरण : पीडित तरुणीला एम्समधून डिस्चार्ज; कुटुंबीयांसह दिल्लीत राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:59 AM2019-09-25T10:59:01+5:302019-09-25T11:07:16+5:30
प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तरुणीला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - रायबरेली येथे झालेल्या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतीलएम्स रुग्णालयात पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरू होते. त्यामुळे उन्नाव बलात्कार प्रकरणाची एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तिला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची दिल्लीतच राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर तरुणीसह कुटुंबीयांचीही काही दिवस दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्याला मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे दिल्लीला स्थलांतरित होण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉमा केअरच्या जय प्रकाश नारायण वसतिगृहात कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पीडितेची साक्ष नोंदवण्यासाठी रुग्णालयात सुनावणी घेण्यास सांगितले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रॉमा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर कुलदीप सिंह सेंगर याने 2017 रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर सेंगर याची भाजपाकडून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. हा अपघात नसून हल्ला असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.
पीडित तरुणीवर याआधी लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर तरुणीला रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी लखनऊ येथून नवी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवण्यात आले आहे. विमानतळावरून रुग्णालयात नेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. त्यामुळे 14 किमी अंतर 18 मिनिटांत पार करण्यात आले. वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी औषधोपचाराची गरज होती. त्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एम्समध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.