मुस्लीम तरुणीला हिंदू पतीसोबत राहण्यास कोर्टाची परवानगी
By admin | Published: April 1, 2015 08:14 PM2015-04-01T20:14:32+5:302015-04-01T20:14:32+5:30
एका हिंदू तरुणासोबत विवाह केल्याचा राग मनात धरुन मुस्लीम तरुणीला पालकांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप न करता त्यांना एकत्रित राहू द्यावे असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - एका हिंदू तरुणासोबत विवाह केल्याचा राग मनात धरुन मुस्लीम तरुणीला पालकांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप न करता त्यांना एकत्रित राहू द्यावे असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
हिंदू तरुणासोबत विवाह केल्याने मुस्लीम समाजातील मुलीच्या पालकांकडून तिला धमकी दिली जात होती तसेच एकत्रित राहण्यास मज्जाव केला जात होता. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. डिसेंबर २०१४ रोजी हे प्रकरण प्रथमच कोर्टात सुनावणीसाठी आले होते. त्यावेळी मुलीने कोर्टात सांगितले की, आपण स्वमर्जीने पती आकाशसोबत दिल्लीहून नोएडाला गेलो होतो. तसेच त्यानंतर आपल्या मर्जीनेच आई-वडिलांच्या घरी परतलो होतो. माझे आकाशसोबत लग्न झाले असून आकाशने आपल्या इच्छेविरुध्द कधीच आपल्याला घरात थांबवले नाही. असे असले तरी सध्या मला माझ्या आई-वडिलासोबत राहण्याची इच्छा असून तीन वर्षापर्यंत वैवाहिक जीवनापासून अलिप्त राहू इच्छिते. मुलीने केलेली मागणी न्यायालयाने मान्य करीत तिला तिच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी दिली तसेच मुलीच्या पालकांना सक्त ताकीद दिली की, दरम्यानच्या काळात मुलीचे अन्य दुस-या कोणाबरोबर निकाह लावून देवू नका असे सांगितले. परंतू जानेवारी महिन्यात आकाशने कोर्टात याचिका दाखल करीत कोर्टाकडे दाद मागितली. आपल्या पत्नीचा आपल्याला फोन आला असून तिचे पालक तिचा निकाह अन्य दुस-या मुलासोबत लावून देण्याच्या प्रयत्नात असल्याने कोर्टाने याची दखल घ्यावी अशी विनंती केली. कोर्टाने पोलिस प्रशासनाला याचा तपास करण्यास सांगून मुलीला व पालकांना कोर्टासमोर उभे करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानूसार पोलिसांनी मुलीला व पालकांना कोर्टात उभे केले असता मुलीने सांगितले की, दुस-याशी लग्न करावे यासाठी पालकांकडून आपल्याला मारहाण करण्यात येत असून आता आपल्याला पती आकाशसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी न्यायालयाकडे मागणी केली. मुलीच्या मागणीचा विचार करीत न्यायालयाने मुस्लीम तरुणीला हिंदू पतीसोबत राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली.