हार्दिक पटेल यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
By Admin | Published: November 7, 2015 03:26 AM2015-11-07T03:26:22+5:302015-11-07T03:26:22+5:30
पटेल आरक्षण आंदोलनादरम्यान कथितरीत्या गर्दीला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाच्या खटल्याचा सामना करीत असलेले या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना कुठलाही
नवी दिल्ली : पटेल आरक्षण आंदोलनादरम्यान कथितरीत्या गर्दीला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाच्या खटल्याचा सामना करीत असलेले या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. संबंधितप्रकरणी गुजरात पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच हार्दिक यांच्या याचिकेवर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अर्थात हे स्पष्ट करताना गुजरात पोलिसांनी दीड महिन्यांत आपला तपास पूर्ण करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले.
हार्दिक पटेल सध्या सुरतच्या तुरुंगात बंद आहेत. गुजरात पोलिसांनी दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यात त्यांनी आव्हान दिले आहे. गत महिन्यात गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक यांनी देशद्रोहाच्या आरोपाला आव्हान देणारी याचिका खारीज केली होती. यानंतर हार्दिक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही तूर्तास हार्दिक यांना दिलासा देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात हस्तक्षेप करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. (वृत्तसंस्था)
.