जेईई, नीट परीक्षेसंदर्भात सहा राज्यांच्या फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:20 AM2020-09-05T06:20:15+5:302020-09-05T06:20:52+5:30
जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडतील.
नवी दिल्ली : जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडतील. १७ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावत परीक्षा आयोजित करण्यास परवानगी देणारा आदेश दिला होता. या आदेशावर फेरविचार करावा, अशी विनंती करीत सहा राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या.
न्या. अशोक भूषण, बी. आर. गवई आणि कृष्ण मुरारी यांच्या न्यायपीठाने फेरविचार याचिकेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत फेरविचार याचिका फेटाळल्या. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ आणि पंजाब या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी अॅड. सुनील फर्नांडिस यांच्यामार्फत फेरविचार दाखल केल्या होत्या.
करिअर दीर्घकाळ टांगणीवर ठेवता येणार नाही
फेरविचार याचिका दाखल करणाºया सहा राज्यांच्या मंत्र्यांत महाराष्टÑाचे उदय सामंत, अमरजित भगत (छत्तीसगढ), मोलॉय घटक (प. बंगाल), रामेश्वर ओरांव (झारखंड), बलबीर सिद्धू (पंजाब), रघु शर्मा (राजस्थान) यांचा समावेश होता.
कोरोनाची साथ असली तरी जीवनक्रम चालला पाहिजे. पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया घालवून विद्यार्थ्यांचे करिअर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी या परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती.