ममता बॅनर्जींचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, राष्ट्रगीत अवमान प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:07 AM2023-03-22T06:07:50+5:302023-03-22T06:08:16+5:30
भाजपचे मुंबईचे सचिव व वकील विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने २ मार्च २०२२ रोजी ममता बॅनर्जींना समन्स बजावले.
मुंबई : राष्ट्रगीत अवमानप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.
भाजपचे मुंबईचे सचिव व वकील विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने २ मार्च २०२२ रोजी ममता बॅनर्जींना समन्स बजावले. याविरोधात बॅनर्जी यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. १२ जानेवारीला विशेष न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना दिलासा देण्यास नकार देत दंडाधिकाऱ्यांना तक्रारीवर नव्याने विचार करण्यास सांगितले.
१ डिसेंबर २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी अर्धवट राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रगीताचा अवमान केला आहे, अशी तक्रार गुप्ता यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने गुप्ता यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली.