भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला न्यायालयाने दिली स्थगिती; उद्या होणार होती निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:00 PM2023-08-11T17:00:45+5:302023-08-11T17:13:25+5:30
उद्या १२ ऑगस्ट रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक होणार होती.
नवी दिल्ली: पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत WFI म्हणजेच भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. उद्या १२ ऑगस्ट रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक होणार होती.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून, तीन वरिष्ठ उपाध्यक्ष, ६ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, दोन कोषाध्यक्ष, सहसचिव आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत. १५ जागांसाठी ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षपदासाठी एका महिलेनेही अर्ज केला आहे.
अध्यक्षपदासाठी संजय सिंह यांच्या उमेदवारीबाबत हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. संजय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचा असल्याचे सांगितले जाते. बजरंग पुनियासह आंदोलक कुस्तीपटूंनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊनही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आंदोलक कुस्तीपटू अध्यक्षपदाच्या एकमेव महिला उमेदवार अनिता शेओरान यांना पाठिंबा देत आहेत. अनिता या माजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेती आणि ब्रिजभूषण विरुद्ध लैंगिक छळाच्या खटल्यातील साक्षीदार आहे.