जयललितांना कोर्टाने सुनावले
By Admin | Published: August 25, 2016 04:54 AM2016-08-25T04:54:45+5:302016-08-25T04:54:45+5:30
राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी अब्रुनुकसानीच्या दाव्याचा शस्त्रासारखा उपयोग करता येणार नाही
नवी दिल्ली : राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी अब्रुनुकसानीच्या दाव्याचा शस्त्रासारखा उपयोग करता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बुधवारी सुनावले.
लोकशाहीचा गळा आवळण्यासाठी तुम्ही अब्रुनुकसानीच्या खटल्याचा उपयोग करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांच्या वकिलांना ऐकवले. न्यायालयाने या पूर्वी जुलैतही याच मुद्द्यावरून त्यांना फटकारले होते. आपल्यावर टीका करणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल करण्याऐवजी तामिळनाडू सरकारने सुशासनावर भर द्यावा, असेही न्यायालयाने सुनावले.
तामिळनाडू सरकारने केलेल्या अब्रुनुकसानीचा दाव्याविरुद्ध डीएमडीकेचे प्रमुख ए. विजयकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निरीक्षणे नोंदविली. राजकीय विरोधकांविरुद्ध अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यासाठी सरकार शासन व्यवस्थेचा उपयोग करू शकत नाही, असेही न्यायालयाने ठामपणे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)