मारेकऱ्यांबाबत कोर्टाचे आदेश पाळणार
By admin | Published: March 4, 2016 02:35 AM2016-03-04T02:35:31+5:302016-03-04T02:35:31+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांच्या सुटकेप्रकरणी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करील, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी दिली.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांच्या सुटकेप्रकरणी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करील, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी दिली.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, आरोपींच्या सुटकेसंदर्भात तामिळनाडू सरकारचे पत्र कालच मिळाले असून, सरकार त्यावर विचार करीत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे आणि तो मानणे ही सरकारची घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी आहे.
तत्पूर्वी काँग्रेस सदस्यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याबाबत तामिळनाडू सरकारच्या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला आणि कें द्राने मारेकऱ्यांच्या सुटकेला कदापि परवानगी देऊ नये अशी मागणी केली. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला, तेव्हा तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुकचे सदस्यही त्यांच्या विरोधात हौद्यात उतरले. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी दिली. तामिळनाडू सरकारने गृहमंत्र्यांना पत्र लिहून राजीव गांधी हत्याकांडातील दोषींच्या सुटकेची केलेली मागणी अत्यंत दुर्दैवी आहे. माजी पंतप्रधानांनी देशासाठी बलिदान दिले असून, त्यांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भावना व्यक्त करतानाच हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यास भविष्यात इतर राज्यांमधूनही अशा मागण्या येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा खरगे यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)