Covaxin: ...तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा
By हेमंत बावकर | Published: January 19, 2021 08:02 AM2021-01-19T08:02:58+5:302021-01-19T08:03:36+5:30
covaxin company factsheet: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडलेली आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका डॉक्टरनेच कोव्हॅक्सिन नको, कोविशिल्ड लस हवी असे सांगत लसीकरण नाकारले आहे.
देशात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झाले आहे. सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या (covaxin company factsheet) चाचण्यांना पाहता कंपनीने लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. यामध्ये अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडलेली आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका डॉक्टरनेच कोव्हॅक्सिन नको, कोविशिल्ड लस हवी असे सांगत लसीकरण नाकारले आहे.
कोव्हॅक्सिन कोणी घ्यावी, कोणी नाही याची माहिती कंपनीने आता दिली आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असेल तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नये असे कंपनीने म्हटले आहे. या आधी सरकारने सांगितले होते की, प्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्तीदेखील लस घेऊ शकतात. तेव्हा असा समज होता, की अशा लोकांमध्ये ही लस कमी प्रभावी असेल. किमोथेरपी, एड्स झालेले आणि स्टेरॉईड घेत असलेले लोक या श्रेणीमध्ये मोडतात. या लोकांना कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ शकते. परंतू त्यांच्यावर या लसी काम करत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
भारत बायोटेकने ब्लिडिंग डिसऑर्डर असलेल्या लोकांनादेखील लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक गंभीर स्वरुपात आजारी आहेत, ताप आहे किंवा त्यांना कोणत्याही अॅलर्जीचा इतिहास आहे, गर्भवती किंवा स्तनदा माता यांनी लसीपासून दूर रहावे, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच लस टोचलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसले तर त्याला तातडीने उपचारासाठी घ्यावे. याचा पुरावा आरटी-पीसीआर टेस्ट असावी.
'कोव्हिशील्ड'च हवी
दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात लसीकरणाची मोहीम सुरू होण्याआधीच रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी 'कोव्हॅक्सीन' ऐवजी 'कोव्हिशील्ड' लस टोचली जावी, अशी मागणी करणारं पत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहीलं होतं.
एम्सच्या संचालकांनी 'कोव्हॅक्सीन' बाबत केलं होतं मोठं विधान
दिल्लीत आज कोरोना लशीकरणाच्या मोहीमेला सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या काळात कोविड योद्धा म्हणून पहिल्या फळीत राहून जीवाची बाजी लावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. पण त्याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सीनचा उल्लेख 'बॅकअप' असा केला होता. पण गुलेरिया यांच्या या विधानावर भारत बायोटेकच्या संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.