ब्रेकिंग! कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी; ICMRच्या संशोधनातून मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:22 PM2021-08-02T13:22:14+5:302021-08-02T13:44:27+5:30
डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढला असताना आयसीएमआरच्या संशोधनातून दिलासादायक माहिती समोर
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्याची आवश्यकता आहे. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंट धोकादायक ठरू लागला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. या परिस्थितीत कोवॅक्सिन लसीबद्दल महत्त्वाची माहिती आहे. कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधनातून समोर आली आहे.
COVAXIN effective against Delta Plus variant of COVID19, says Indian Council of Medical Research (ICMR) study pic.twitter.com/8DxlqXixt5
— ANI (@ANI) August 2, 2021
भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस लक्षणं असलेल्या कोविड-१९ विरोधात ७७.८ टक्के, तर डेल्टा व्हेरिएंटविरोधात ६५.२ टक्के असल्याचं प्रभावी असल्याची माहिती याआधीच समोर आली आहे. यानंतर आता कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधातही प्रभावी असल्याचं आयसीएमआरचा अहवाल सांगतो. त्यामुळे मेक इन इंडिया कोवॅक्सिनला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात संशोधन आणि उत्पादन झालेली कोवॅक्सिन ही एकमेव लस आहे.
कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेनं अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली. 'आपत्कालीन वापरासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. सध्या याचा आढावा घेण्याचं काम संघटनेकडून सुरू आहे,' अशी माहिती पवार यांनी राज्यसभेत दिली. जागतिक आरोग्य संघटनेला यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यास ६ आठवड्यांचा कालावधी लागतो.