मोठी बातमी! लहान मुलांच्या Covaxin लसीला लवकरच मंजुरी मिळणार, भारत बायोटेकनं DCGI पाठवला डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 02:21 PM2021-10-03T14:21:50+5:302021-10-03T14:22:41+5:30
Covaxin Approval For 2-18 Age Group: भारतीय बनावटीची कोरोना विरोधी लस Covaxin ला लहान मुलांवरील वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे
Covaxin Approval For 2-18 Age Group: भारतीय बनावटीची कोरोना विरोधी लस Covaxin ला लहान मुलांवरील वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीनं २ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणीचा संपूर्ण अहवाल ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) पाठवला आहे. भारत बायोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली. डीसीजीआयकडून लवकरच अहवालाची तपासणी केली जाणार आहे. चाचणीचा अहवाल समाधानकारक वाटला तर लवकरच कोव्हॅक्सीनला लहान मुलांवरील वापरला आपत्कालीन मंजुरी मिळू शकते. असं झाल्यास देशात लहान मुलांना दिली जाणारी पहिली स्वदेशी लस भारताला उपलब्ध होणार आहे.
तीन टप्प्यात झाली होती चाचणी
एम्ससह देशातील विविध ठिकाणी लसीची लहान मुलांवर चाचणी घेण्यात आली होती. एकूण तीन टप्प्यात चाचणी घेतली गेली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षांमधील मुलांवर चाचणी केली गेली. त्यानंतर ६ ते १२ वयोगट आणि सर्वात शेवटी २ ते ६ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केली गेली. देशात १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सीन लस घेता येत आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप परवागनी देण्यात आलेली नाही.
WHO कडूनही लवकरच मंजुरी मिळणार
जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोव्हॅक्सीनला याच महिन्यात मंजुरी दिली जाईल असा विश्वास डॉ. एल्ला यांनी व्यक्त केला आहे. डब्ल्यूएचओला भारत बायोटेककडून आवश्यक अशी सर्व माहिती पुरविण्यात आल्याचं एल्ला यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार, भारत बायोटकनं डब्ल्यूएचओला ९ जुलै रोजी सर्व माहिती सुपूर्द केली आहे. जागतिक संघटनेला एखाद्या लसीचं परिक्षण करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. डब्ल्यूएचओकडून कोव्हॅक्सीनला मंजुरी मिळाली तर ही लस घेतलेल्या नागरिकांना क्वांराटइन नियमांचं पालन न करता परदेश यात्रा करणं शक्य होणार आहे.