दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 07:44 PM2023-09-16T19:44:44+5:302023-09-16T19:45:13+5:30
पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला जात आहे. सुरक्षादलांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून आज जोरदार गोळीबार करण्यात आला आहे. बारामुल्लामध्ये शनिवारी भारतीय जवानांनी एलओसीवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार केले आहे. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या दहशतवाद्याला पाकिस्तानी चौकीजवळ ठार करण्यात आले आहे. या दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय जवानांवर कव्हर फायरिंग करण्यात आली आहे.
पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला जात आहे. सुरक्षादलांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यांना त्रास देण्यासाठी पाकिस्तान ही आगळीक करत आहे. भारत सर्जिकल स्ट्राईक करेल या भीतीने पाकिस्तानी सैनिक उरी सेक्टरमध्ये गोळीबार करत आहेत.
भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त अभियान सुरु केले आहे. यामध्ये उरी सेक्टर, बारामुल्लामध्ये घुसखोरी करणाऱ्याा तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह पाकिस्तानी पोस्टजवळ आहे. तो ताब्यात घेण्यास पाकिस्तानी गोळीबारामुळे अडचणी येत आहेत. मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याची माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
दहशतवाद्यांच्या ताब्यातून एक एके-47, एक एके-74, एक चिनी पिस्तूल तसेच पाकिस्तानी आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले आहे. इतकेच नाही तर दहशतवाद्याच्या मृतदेहासोबत ५ किलो आरडीएक्सही सापडले आहे.