Covid 19 Callertune : कोविडच्या कॉलरट्यूनला कंटाळलात का? आता 'नो-टेन्शन'; सरकार हटवण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:53 PM2022-03-28T18:53:07+5:302022-03-28T18:53:24+5:30
Covid 19 Callertune : कोरोनाच्या कॉलरट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचा फोन करण्यामध्ये उशिर होत असल्याची तक्रार लोकांकडून करण्यात येत होती.
Covid 19 Callertune : Covid-19 Caller Tune मुळे आपल्याला महत्त्वाचा फोन करण्यात उशिर होत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. परंतु आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनाची ही कॉलरट्यून आता सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे. जवळपास दोन वर्षांनी आता ही कॉलरट्यून हटवण्यात येणार आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. परंतु केव्हापासून ही कॉलरट्यून बंद केली जाईल, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे आता ही ट्यून बंद होण्याची शक्यात आहे. कोविड १९ कॉलरट्यून जवळपास दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. भारतात लॉकडाऊनच्या दरम्यान ही ट्यून ऐकू येत होती.
Govt considering dropping COVID-19 pre-call announcements from phones after almost two years of raising awareness about disease: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) March 27, 2022
यामध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज होता. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सुरक्षेच्या नियमांच पालन करण्याच्या सूचना याद्वारे केल्या जात होत्या. यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ही ट्यून बदलण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा या कॉलरट्यून मध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणानं किती आकडा गाठला यासंदर्भात सांगण्यात येत आहे. कॉल करताना यामुळे आपला वेळ वाया जात असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. यामुळे अनेकांनी व्हॉट्सअॅप कॉलला पसंती देण्यास सुरूवात केली होती.