Covid In India: दोन दिवसात ३००० हून अधिक नवे कोरोना रुग्ण, अचानक इतका कसा वाढतोय कोरोना? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:46 PM2023-03-27T15:46:22+5:302023-03-27T15:47:50+5:30
Covid In India: कोरोना व्हायरसमुळे देशात पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. गेल्या २४ तासात १८०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
Covid In India: कोरोना व्हायरसमुळे देशात पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. गेल्या २४ तासात १८०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोविड बाधितांचा आकडा १८०० पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे देशात सक्रिय रुग्णांची संख्याही १० हजारांहून अधिक झाली आहे. कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे नवीन लाट येण्याची शक्यताही आहे. कोविड रुग्णांचा चढता आलेख पाहता ICMR ने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. सरकारही कोविड रोखण्यासाठी पुरेशी पावलं उचलत आहे.
तज्ज्ञांच्या मते कोविडचे वाढते रुग्ण पाहता लोकांना सावध राहण्यास सांगितलं गेलं आहे. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण पुन्हा का वाढू लागले आहेत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
व्हायरसच्या म्युटेशनमुळे रुग्णसंख्येत वाढ
नवी दिल्लीतील एम्स येथील क्रिटिकल केअर विभागातील प्राध्यापक डॉ. युधवीर सिंग यांनी स्पष्ट केलं की कोरोना विषाणूमध्ये सतत म्युटेशन होत आहे. यामुळेच गेल्या तीन वर्षांपासून या विषाणूचे नवीन उपप्रकार समोर येत आहेत. या मालिकेत, Omicron चे सब-व्हेरियंट XBB.1.16 देखील आले आहेत, जे देशात सतत पसरत आहेत. अशा परिस्थितीत या प्रकारामुळे कोविडची रुग्ण संख्या वाढत असल्याचा संशय आहे. मात्र, हा व्हेरिअंट फारसा संसर्गजन्य नाही ही दिलासादायक बाब आहे. यामुळे मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं नाही.
हवामान बदल हे देखील एक कारण
कोविड तज्ज्ञ डॉ. कमलजीत सिंह म्हणतात की, हवामानातील बदल हे देखील कोरोना विषाणूच्या प्रसाराचं एक कारण आहे. या ऋतूत व्हायरस आणि बॅक्टेरिया सक्रिय होतात. त्यामुळे संसर्ग झपाट्यानं पसरतो. लोक मास्क वापरत नसल्यानं कोरोनाचा प्रसार अधिक होत आहे. लोकांना मास्क घालण्याचा आणि कोविड टाळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असेही डॉ. सिंह म्हणतात. काही दिवसांनी ही रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल, नवीन लाट येण्याच्या शक्यतेवर डॉ. सिंह यांनी कोविड रुग्णांची वाढ निश्चितच नोंदवली जाऊ शकते. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेसारखी फारशी वाढ होणार नाही.