COVID-19 Effect: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 07:08 PM2021-04-09T19:08:53+5:302021-04-09T19:14:35+5:30
COVID-19 Effect: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व शाळा (शासकीय, खाजगी) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. (COVID-19 Effect: kejriwal government decide to close all schools till further order)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, येत्या सोमवारपासून दिल्लीत सहाव्या सेरो सर्वेक्षणचे काम सुरू होणार आहे. सहाव्या सर्वेक्षणात 272 प्रभागांत 28 हजार नमुने घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील 100 लोकांचे नमुने गोळा करण्याची योजना आहे. या सर्वेक्षणात केवळ अशाच लोकांचा समावेश आहे ज्यांना लस देण्यात आली आहे.
यापूर्वी जानेवारीत पाचवा सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातच दिल्लीच्या निम्म्याहून अधिक लोकांमध्ये कोरोनाची लागण झाली. पाचवा सर्वेक्षण 15 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान घेण्यात आला. त्यात एकूण 28000 लोकांचे नमुने घेण्यात आले. सर्वेक्षण केलेल्या 56.13 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज आढळले होते.
देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरूच
देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण 1.31 लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास 800 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.