Delhi Lockdown : दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 08:31 AM2021-04-25T08:31:14+5:302021-04-25T08:39:25+5:30
Delhi Lockdown : गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा सुद्धा आता वाढू लागला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने (Delhi Government) राजधानीत एक आठवड्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर होता. या लॉकडाऊनचा कालावधी आज संपणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता सरकार पुन्हा एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यावर विचार करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविला जाऊ शकतो. (covid-19 lockdown may be extended for a week in the capital delhi)
गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा सुद्धा आता वाढू लागला आहे. दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून लॉकडाऊन असूनही मृतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. कोरोना रुग्ण वाढीचा दर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारकडून लॉकडाऊन वाढविला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे 20 एप्रिलपासून राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, याचा कालावधी सोमवारी सकाळी संपत आहे. अशा परिस्थितीत आज डीडीएमए (दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) च्या महत्त्वपूर्ण बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
(जगात सर्वाधिक नवे रुग्ण भारतात आढळले; २,६२४ जणांचा मृत्यू, २.१९ लाख रुग्ण झाले बरे)
दिल्लीतील कोरोना परिस्थिती जी अनियंत्रित होत आहे आणि कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत. दिल्लीतील मागणीच्या तुलनेत फारच कमी ऑक्सिजन उपलब्ध आहे, ज्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत काही दिवस अजून लॉकडाऊनमध्ये वाढ करून कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ३५७ जणांचा मृत्यू
दिल्लीत कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढत्या कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासांच ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २४१०३ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ९३०८० वर पोहोचली आहे. गेल्या शुक्रवारी ३४८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २४३३१ नवीन रुग्णांचा कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची २६१६९ नवीन प्रकरणे नोंदविली गेली. याशिवाय, ३०६ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत गेल्या १० दिवसांत कोरोनामुळे १७५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.