Corona Virus : धोक्याची घंटा! देशात कोरोनाचा कहर, 9 जिल्ह्यांत वेगाने वाढताहेत रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:37 AM2023-03-16T11:37:42+5:302023-03-16T11:45:43+5:30
Corona Virus : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा कोरोना व्हायरससाठी केलेल्या चाचण्यांची संख्या आणि पॉझिटिव्ह केसेसच्या संख्येवरून निर्धारित केला जातो.
देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा आता 600 च्या पुढे गेला आहे. 117 दिवसांनंतर, 24 तासांत इतके नवीन रुग्ण वाढले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्रात प्रत्येकी दोन आणि उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीचाही संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील 9 जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर 10 टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. 8 ते 14 मार्च या आठवड्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीने पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील पिथौरागडमध्ये सर्वाधिक 25 टक्के पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ मिझोराममधील आयजोल (16.67%), हिमाचल प्रदेशातील शिमला (14.29%), मंडी (13%), सोलन (12.50%) आणि गुजरातमधील गीर सोमनाथ (11.76%) यांचा नंबर लागतो. आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणखी 15 जिल्हे आहेत, जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा 5 आणि 10% च्या दरम्यान आहे.
बुधवारी दिल्लीतील कोविड पॉझिटिव्ह दर 3.05% वर पोहोचला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत या व्हायरल इन्फेक्शनचे 1379 सँपल्स तपासण्यात आले असून 42 पॉझिटिव्ह आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सूत्रांनी TOI ला सांगितले की, 'गेल्या 24 तासांत 95,385नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 618 पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा कोरोना व्हायरससाठी केलेल्या चाचण्यांची संख्या आणि पॉझिटिव्ह केसेसच्या संख्येवरून निर्धारित केला जातो. ICMR चे शास्त्रज्ञ आणि इम्युनोलॉजिस्ट डॉ. एनके मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेथून जास्त पॉझिटिव्ह केसेस येत आहेत त्या भागात जीनोम सिक्वेन्सिंग केले जावे, जेणेकरून नवीन व्हेरिएंट दिसण्याची शक्यता नाकारता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"