काळजी घ्या! वेगाने पसरतोय कोरोनाचा JN.1 सब व्हेरिएंट; रुग्णसंख्या 196 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:52 PM2024-01-01T19:52:08+5:302024-01-01T19:52:17+5:30
Coronavirus Cases: आतापर्यंत दहा राज्यांमध्ये या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
Covid-19 Sub Variant JN.1: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. कोरोनाचा नवीन JN.1 रुग्णांची संख्यादेखील लक्षणीयरित्या वाढतीये. नववर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) JN.1 रुग्णांची संख्या 196 वर पोहोचली. विशेष म्हणजे, देशभरातील दहा राज्यांमध्ये संसर्ग पसरलाय.
INSACOG च्या मते, ओडिशातदेखील नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह ओडिशा त्या राज्यांमध्ये सामील झाला आहे, जिथे JN.1 प्रकरणे आढळली आहेत. आतापर्यंत, देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत या नवीन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण
आतापर्यंत केरळमध्ये JN.1 ची सर्वाधिक 83 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यानंतर गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, कर्नाटकात 8, महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 5, तामिळनाडूमध्ये 4, तेलंगणात 2 आणि ओडिशा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
कोव्हिड-19 ची 636 नवीन प्रकरणे
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, भारतात कोव्हिड -19 ची 636 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह सक्रिय रुग्णांची संख्या 4,394 झाली आहे. तसेच, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोघे केरळचे, तर एक तामिळनाडूचा आहे. दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये देशात कोव्हिड-19 चा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत 4.50 कोटी (4,50,13,908) प्रकरणे नोंदवली गेली, तर जवळपास चार वर्षांत या विषाणूमुळे देशभरात 5.3 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.