Corona Vaccination: मोदी सरकारचा 'तो' निर्णय अतिशय वाईट; सीरमचे पुनावाला स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 07:10 AM2021-08-14T07:10:21+5:302021-08-14T07:20:26+5:30
डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, या नेत्यांच्या थापा- सायरस पुनावाला
पुणे : ‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, अशा थापा नेते मारत आहेत. महिन्याला १५ कोटी डोसचे उत्पादन करणे हे सोपे नाही. ते १५ कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. दर वर्षी ११०-१२० कोटी डोस देण्याचे आश्वासन आम्ही दिले. इतर कंपन्यांच्या लसींचे उत्पादनही सुरू आहे. या सगळ्यांची आकडेमोड करून किती डोस उपलब्ध होऊ शकतात, हे मोजता येऊ शकेल, अशा शब्दांत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
कार्यक्रमानंतर डॉ. पूनावाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिरमतर्फे कोविशिल्डच्या १० कोटी लसींचे उत्पादन एका महिन्यात केले जाते. नागरिकांना लवकर लस मिळावी, यासाठी कोरोनावरील लसीला प्राधान्य देत आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धमक्या आल्यामुळे देश सोडावा लागला, याचा इन्कार करुन आपण उन्हाळी सुट्टीसाठी विदेशात गेलो होतो असेही पूनावाला यांनी सांगितले.
कॉकटेल परिणामकारक नाही
कॉकटेल लसीला माझा विरोध आहे. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले आणि परिणामकारकता चांगली नसल्यास लस उत्पादक कंपन्या एकमेकांवर आरोप करतील. चाचण्यांमध्ये कॉकटेलची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. मोदी सरकारने लसीच्या निर्यातीवर बंदी आणून अतिशय वाईट निर्णय घेतला आहे.
तिसरा डोस घ्यावा लागेल
कोविशिल्ड लस घेतल्यावर निर्माण झालेल्या अँटिबॉडी ६ महिन्यांनी कमी होऊ लागतात. म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर दोन महिने असले पाहिजे. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे मोदी सरकारने तीन महिन्यांच्या अंतराचा फतवा काढला आहे. कोरोना होऊन गेलेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी. - सायरस पूनावाला