Covid-19 Vaccine : मोदी सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार 'इतके' डोस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:05 PM2021-07-16T14:05:19+5:302021-07-16T14:11:43+5:30
Covid-19 Vaccine : सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. केंद्र सरकार लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी रुपयांचे जवळपास 66 कोटी डोस खरेदी करणार आहे. यामुळे निश्चित देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल. तसेच, ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. (Covid-19: Government orders 66 crore vaccine doses worth Rs 14,505 crore)
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 66 कोटी डोस व्यतिरिक्त केंद्र सरकारने हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई च्या कॉर्बिव्हॅक्स लसीचे 30 कोटी डोससाठी आगाऊ रक्कम देखील दिली आहे. यानुसार ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात एकूण 96 कोटी डोस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. हे 96 कोटी डोस केंद्राच्या 75 टक्क्यांच्या वाट्यामधले असतील. या व्यतिरिक्त खासगी क्षेत्रामध्ये या कालावधीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे 22 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत.
'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, #ICMR चा इशारा https://t.co/1Wz7i4AQMW#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2021
आत्तापर्यंत एकूण 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. आता मोदी सरकारने आणखी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरणार आहे. लवकरच देशाला लसींचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीतील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांचे एकूण उत्पादन 88 कोटी इतके ठरविण्यात आले आहे. जुलैमध्ये 3.5 कोटींची घट झाली असली तरी या कालावधीमध्ये कोवॅक्सिनच्या 38 कोटी डोसचे उत्पादन घेण्यात आले.
सरकारच्या योजनेत इतरही लसींचा समावेश
कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि कोर्बेवॅक्स यांच्या व्यतिरिक्त सरकारच्या 135 कोटी डोसमध्ये स्पुटनिक व्ही आणि झायडस कॅडिला या लसींच्या डोसचाही समावेश आहे. स्पुटनिक व्ही लसीचे स्थानिक उत्पादन अद्याप सुरु व्हायचे आहे तर झायडस कॅडिला या लसीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. केंद्राच्या अहवालानुसार, स्पुटनिक व्हीचे 10 कोटी डोस तर झायडस कॅडिलाचे पाच कोटी डोस या वर्षात उपलब्ध होणार आहेत.