सावधान! भारतात वेगाने वाढतोय कोरोना, 'ही' गोष्ट ठरतेय जबाबदार; WHO ने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 01:02 PM2023-04-01T13:02:51+5:302023-04-01T13:03:20+5:30
Corona Virus : कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही ही दिलासादायक बाब आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2994 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 16,354 झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर भाष्य करताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, नवीन Omicron प्रकार XBB.1.16 भारतात वाढत्या कोरोनासाठी जबाबदार आहे. WHO ने 27 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 पर्यंतच्या कोरोना डेटावर ही टिप्पणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, या काळात कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही ही दिलासादायक बाब आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की केवळ भारतच नाही तर संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात अचानक नवीन कोविड प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रमाणात वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर प्रकरणांमध्ये सुमारे 27 टक्के घट झाली आहे. WHO नुसार, भारतात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये 437 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीसाठी नवीन Omicron प्रकार XBB.1.16 जबाबदार आहे. डब्ल्यूएचओच्या मते, हा प्रकार BA.2.10.1 आणि BA.2.75 चा पुन्हा एकत्रित केलेला आहे.
भारताव्यतिरिक्त आग्नेय आशियातील इतर देश, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की संपूर्ण दक्षिण आशिया भागात गेल्या 28 दिवसांत सुमारे 152 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना प्रकरणातील वाढ लक्षात घेता, WHO सहा प्रकारांसह XBB.1.16 आणि XBB.1.5 या नवीन ओमायक्रॉन प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. 27 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 पर्यंत जगभरात कोरोनाचे 36 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोविडमुळे 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
WHO ने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर कोविड प्रकरणांमध्ये घट झाली असली तरी काही देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की नवीन Omicron प्रकार XBB.1.16 भारतात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्यास जबाबदार आहे. डब्ल्यूएचओच्या मते, हा प्रकार BA.2.10.1 आणि BA.2.75 चा पुन्हा एकत्रित केलेला आहे. XBB.1.16 SARS-CoV-2 पेक्षा वेगाने पसरू शकतो. त्याची लक्षणे Omicron प्रकारासारखीच आहेत. यामध्ये जास्त ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी आणि सर्दी यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"