चीनमधील कोरोना विस्फोटामुळे संपूर्ण जगात दहशत, भारत अलर्ट मोडवर; धडाधड घेतले निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 07:19 PM2022-12-21T19:19:00+5:302022-12-21T19:19:23+5:30
कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करत असताना आता जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येनं जगभरातील देशांना धडकी भरली आहे.
नवी दिल्ली-
कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करत असताना आता जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येनं जगभरातील देशांना धडकी भरली आहे. आज भारताच्या आरोग्य विभागानं तातडीनं एक बैठक बोलावली आणि महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. कोणत्याही कठीण परिस्थिला सामोरं जाण्यासाठी संपूर्ण तयारी आहे असा दावा सरकारनं केला आहे. कोरोनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला याआधीच मोठा धक्का बसला आहे आणि पुन्हा एकदा असा धक्का सहन करणं नुकसानदायक ठरू शकतं.
चीनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाच्या ३६ लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० हजार रुग्णांनी प्राण गमावले आहेत. चीनसह अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर अमेरिका, जर्मनी आणि तैवान सारख्या देशांमध्येही रुग्णवाढ होत आहे.
चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर
इतर देशांच्या तुलनेत चीनमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. चीनच्या चोंगकिंग शहरातील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यात रुग्णांसह डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. तसंच रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नसल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत.
जागतिक बँकेनं वाढीचा अंदाज केला कमी
चीनमध्ये कोरोना हातपाय पसरू लागल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक बँकेनं आपल्या ताज्या अहवालात चीनच्या अंदाजित विकास दरात मोठी घट केली आहे. वर्ल्डबँकेनं चीनचा अंदाजित विकास दरात घट करून २.७ टक्के इतका केला. याआधी जून महिन्यात हाच दर ४.३ टक्के राहील असं जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या सहा महिन्यात १.६ टक्के घट झाली आहे. इतकंच नाही, तर जागतिक बँकेनं २०२३ या वर्षासाठी वाढीचा दर ८.१ टक्क्यांहून थेट ४.३ टक्के इतका केला आहे.
भारताला चिंता करण्याची गरज नाही
चीनमधील कोरोना विस्फोटामुळे भारत सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. सरकारच्या दाव्यानुसार देशातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सरकार सज्ज आहे. तसंच कोरोना गेलेला नाही त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. यात निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी बैठकीनंतर भारतातील जनतेनं पॅनिक होण्याचं काही कारण नाही. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि बूस्टर डोस जरूर घ्यावा असं आवाहनही डॉ. पॉल यांनी केलं आहे.
आवश्यक पावलं उचलणार
देशाची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचं आरोग्य लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाला कोणतीही चूक करायची नाही. डॉ. पॉल म्हणाले की देशात कोरोना चाचण्या योग्य प्रमाणात होत आहेत. परिस्थितीवर सरकार गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातील. कोरोनाच्या याआधीच्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. असं असतानाही भारतानं कमबॅक करत जगासमोर आदर्श निर्माण केला आणि जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देश उदयास आला.