Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:52 PM2024-05-15T12:52:53+5:302024-05-15T13:00:16+5:30
Corona Virus : कोरोना व्हायरस KP.2 हा नवीन व्हेरिएंट गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून भारतातील लोकांमध्ये आला आहे. या व्हायरसला FLiRT असं नाव देण्यात आलं आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचं संकट अद्याप देखील टळलेलं नाही. नवनवीन व्हेरिएंटत येत आहेत. अशातच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस KP.2 हा नवीन व्हेरिएंट गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून भारतातील लोकांमध्ये आला आहे. या व्हायरसला FLiRT असं नाव देण्यात आलं आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट FLiRT हा अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियामधील कोरोनाच्या वाढत्या केसशी जोडला जात आहे.
कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट FLiRT Omicron वंशाचा सब व्हेरिएंट आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, KP.2 हा व्हेरिएंट JN.1 चा एक भाग मानला जातो. त्यात नवनवीन म्युटेशन्स आहेत. त्याचे नाव FLiRT या अक्षरांच्या आधारे देण्यात आले आहे. हा नवीन व्हेरिएंट म्यूटेशन व्हायरसला अँटीबॉडीवर अटॅक करायला देतो.
सध्या या नवीन व्हायरसपेक्षा JN.1 चा भारतात जास्त प्रभाव आहे. त्याची आकडेवारी दर्शवते की या प्रकाराची 679 प्रकरणे भारतात सक्रिय आहेत. ही आकडेवारी 14 मे पर्यंतची आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, FLiRT, अधिक प्राणघातक आहे कारण त्यात पूर्वीच्या कोरोना दरम्यान वापरलेल्या इम्यूनिटी बूस्टरपासून वाचण्याची क्षमता आहे. सध्या सर्व डॉक्टर यावर लक्ष ठेवून आहेत.
या नवीन व्हेरिएंटविषयी बोलताना अशोका विद्यापीठातील त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसचे डीन डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, असे म्यूटेशन यापूर्वीही पाहिले गेले आहे. घाबरण्याची गरज नाही. त्याच वेळी, अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) म्हणतं की या नवीन व्हेरिएंटमध्ये असे कोणतेही संकेत नाहीत की ते KP.2 किंवा इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा अधिक गंभीर आहे.
या नवीन कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांबद्दल बोलताना अपोलो हॉस्पिटलचे डॉ. राजेश चावला सांगतात की, या व्हेरिएंटमुळे प्रभावित झालेल्या लोकांची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होईल, खोकला, सर्दी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा आणि थंडी वाजणे अशा गोष्टी जाणवतील. आरोग्याविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.