CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट कुठून आला? भारतासाठी किती धोकादायक?; जाणून घ्या एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 05:52 PM2021-11-27T17:52:15+5:302021-11-27T17:55:23+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जग चिंतेत; भारत सरकार सतर्क
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटचं ओमीक्रॉन असं नामकरण केलं आहे. हा व्हेरिएंट आधीच्या तुलनेत अधिक वेगानं म्युटेट होतो. त्यामुळे चिंता वाढली आहे.
कोरोनाचा ओमीक्रॉन व्हेरिएंट डेल्टा, डेल्टा प्लस आणि अन्य व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादाक आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेपासून बोध घेत केंद्र सरकार सतर्क झालं असून सर्व राज्यांसाठी नियमावली जारी केली आहे.
व्हेरिएंट कुठून आला?
कोरोनाचा नवा व्हेरिएंट कुठून आला, हे पूर्णपणे स्पष्ट नसल्याचं लंडनमधील यूसीएल जेनेटिक्समधील वैज्ञानिकानं सांगितलं. आफ्रिकेतील देशांमध्ये याचे काही रुग्ण आढळून आले.
हा व्हेरिएंट अधिक धोकादायक?
ओमीक्रॉन व्हेरिएंट अतिशय वेगानं ३० वेळा म्युटेट होतो. ही अतिशय चिंतेची बाब आहे. अल्फा, बिटा आणि डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट जास्त वेगानं पसरतो. त्यामुळे अधिक जणांना बाधित करतो.
केंद्र सरकारनं काय काय केलंय?
कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि त्याचा धोका पाहता भारत सरकारनं सर्व राज्यांसाठी नियमावली जारी केली आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड टेस्ट जिनॉम सिक्वन्सिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओमीक्रॉन विषाणू पसरलेल्या देशांची यादी तयार करण्यात आली. तिथून येणाऱ्या नागरिकांना भारतात दाखल झाल्यानंतर १४ दिवस क्वारंटिन करण्यात येईल. रवाना होण्याच्या ४८ तास आधी त्यांना कोविड चाचणीचा अहवाल द्यावा लागेल.
भारतात किती रुग्ण आढळले?
सुदैवानं आतापर्यंत देशात ओमीक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
भारतातील तज्ज्ञ काय म्हणतात?
नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षा किती धोकादायक आहे यासाठी संशोधनाची गरज असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.
नवा व्हेरिएंट कुठे कुठे सापडला?
दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, हाँगकाँग, इस्रायल, बेल्जियममध्ये आढळले रुग्ण
लस प्रभावी ठरणार का?
कोरोना लसीविरोधात ओमीक्रॉन निष्प्रभ ठरत असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत, असं तज्ज्ञ म्हणतात. पुढील दोन आठवड्यांत या प्रश्नाचं उत्तर देऊ असं फायझर-बायोएनटेकनं सांगितलं.