कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीला रुग्णालयानं नाकारला प्रवेश; रस्त्यावरच दिला बाळाला जन्म
By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 10:54 AM2020-11-15T10:54:41+5:302020-11-15T10:55:17+5:30
रुग्णालय प्रशासनाकडून चौकशीचे आदेश; बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
श्रीनगर: कोरोना बाधित गर्भवतीला रुग्णालयानं प्रवेश नाकारल्याची घटना काश्मीरमध्ये घडली. त्यामुळे महिलेची प्रसुती रस्त्यावर झाली. या घटनेनंतर परिसरात आंदोलनं झाल्यानं रुग्णालयानं त्याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे.
वेवान गावातील महिलेनं प्रसुतीसाठी बांदिपोऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात नाव नोंदवलं होतं. प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला तिचे कुटुंबीय रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोना चाचणीचादेखील समावेश होता. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसुती करण्यास नकार दिला. बांदिपोरापासून २५ किलोमीटरवर असणाऱ्या हाजिनमधील कोविड केंद्रात जाण्याचा सल्ला गर्भवतीच्या कुटुंबियांना देण्यात आला.
दरम्यान प्रसुतीकळा वाढल्यानं महिलेनं रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच बाळाला जन्म दिला. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी वारंवार रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडे विनवणी केली. मात्र तरीही एकही डॉक्टर महिलेवर उपचार करण्यासाठी बाहेर आला नाही, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला. 'आसपास असलेल्या काही लोकांनी तिच्यासाठी ब्लँकेट्स दिली. पण तरीही रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्यानं बाहेर येऊन तिला तपासण्याची तसदी घेतली नाही,' अशी व्यथा त्यांनी मांडली. रस्त्यावरून जात असलेल्या काही महिलांनी प्रसुतीसाठी मदत केल्याचं महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
यानंतर महिलेच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केलं. रुग्णालय व्यवस्थापनानं त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. महिलेस असहकार्य केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना करून प्रसुतीसाठी मदत का केली नाही, याची विचारणा कर्मचाऱ्यांकडे नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.