Covishield Vaccine: 'कोविशील्ड'बाबत नवा दावा, दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:34 PM2021-12-19T13:34:03+5:302021-12-19T13:34:47+5:30
कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत.
नवी दिल्ली-
कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. संशोधनानुसार लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये ९० टक्के अँडिबॉडिज आढळून आल्या आहेत. त्यामुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे स्थित बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयानं जारी केलेल्या अहवालातून संपूर्ण माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एकूण लोकसंख्येपैकी बहुतांश जणांनी अद्याप कोरोना विरोधी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे अशांना बुस्टर डोस देणं योग्य ठरणार नाही असंही अहवालातून समोर आलं आहे.
कोवीशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या एकूण ५५८ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या केलेल्या चाचणीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यांच्यात अँटिबॉडीचं प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसून आलं आहे. "कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आल्यानंतर लस घेतलेल्यांमध्ये अँटिबॉडी टिकून राहण्याचा कालावधी देखील वाढला आहे", असं डॉ. तांबे यांनी सांगितलं.
कोविशील्ड लसीचे लसीकरण पूर्ण केलेल्यांमध्ये तीन महिन्यांनंतर ९६.७७ टक्के अँटिबॉडी आढळून आल्या आहेत. तर सात महिन्यांनंतर याचं प्रमाण ९१.८९ टक्के इतकं आढळून आलं आहे. दरम्यान, नुकतंच दिल्लीत करण्यात आलेल्या सहव्या सीरो सर्व्हेतही सहभागी झालेल्यांपैकी ९० टक्के नागरिकांमध्ये कोरोना विरोधी अँटिबॉडी आढळून आल्या आहेत.