कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 01:49 PM2024-05-02T13:49:39+5:302024-05-02T13:51:21+5:30
Covishield side effect latest news:अदार पुनावाला यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या कंपनीने बनविलेल्या लसीचे उत्पादन केले होते. भारतात ही लस पुरविण्याबरोबरच जगभरातील देशांनाही ही लस देण्यात आली होती. यामुळे भारत या देशांसाठी वरदान ठरला होता.
कोव्हिशिल्डमुळे साईड इफेक्ट असल्याचे खुद्द ही लस बनविणाऱ्या अॅस्ट्राझिनेका या कंपनीनेच मान्य केल्याने भारतात ही लस बनविणारी सीरम इन्स्टिट्यूट कंपनी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर भारतात दोन मुलींचा मृत्यू झाला होता. या मुलींचे पालक आता सीरमला कोर्टात खेचण्याची तयारी करत आहेत.
अदार पुनावाला यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या कंपनीने बनविलेल्या लसीचे उत्पादन केले होते. भारतात ही लस पुरविण्याबरोबरच जगभरातील देशांनाही ही लस देण्यात आली होती. यामुळे भारत या देशांसाठी वरदान ठरला होता. दोन दिवसांपूर्वी ही लस बनविणाऱ्या ब्रिटनच्या अॅस्ट्राझिनेकाने लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या बनू शकतात, असे तेथील कोर्टात मान्य केले होते. आता यावरून भारतात सीरमविरोधात दावे ठोकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोना लसीचे साईड ईफेक्ट असल्याचे दावे केले जात होते. तरुणांना अचानक हार्ट अॅटॅक येत होते. यामुळे हे दावे केले जात होते. परंतु ते फेटाळले जात होते. कोरोना काळातच कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला होता. आता या मुलींच्या वडिलांनी सीरमविरोधात दावा ठोकण्याचे जाहीर केले आहे.
ऋतिका श्री ऑम्ट्री आणि करुण्या अशी या दोन मुलींची नावे आहेत. त्यांचा कोरोना काळात लस घेतल्यानंतर काही दिवसांत मृत्यू झाला होता. ऋतिका आर्किटेक्टचा अभ्यास करत होती. तिला मे महिन्यात पहिला डोस देण्यात आला होता. यानंतर एका आठवड्यातच ताप आणि उलट्या होऊ लागल्या होत्या. काही दिवसांनी ती चालूही शकत नव्हती. एमआरआय स्कॅनमध्ये तिच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे आणि रक्तस्त्राव झाल्याचे समजले होते. दोन आठवड्यांत तिचा मृत्यू झाला होता.
तिचे आई-वडील तिच्या मृत्यूच्या खऱ्या कारणाबद्दल माहिती नव्हती. २०२१ मध्ये त्यांनी आरटीआयद्वारे मागणी केली होती, त्यात तिला थ्रोम्बोसिस विद थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम टीटीटी झाल्याचे व लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले. अशाच प्रकारे वेणुगोपाल गोविंदन यांची मुलगी करुण्याचाही जुलै २०२१ मध्ये मृत्यू झाला होता. लस घेतल्यानंतर एका महिन्यात तिचा मृत्यू झाला. तेव्हा लसीवरील राष्ट्रीय समितीने हा पुरेसा पुरावा नसल्याचे सांगत त्यांचा दावा फेटाळला होता.
टीटीकेवरून अॅस्ट्राजिनेकावर दाव्यांवर दावे दाखल केले जात आहेत. आता तसेच दावे सीरमवरही दाखल होण्याची तयारी या दोन मुलींचे पालक करत आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे अॅस्ट्राझिनेकाची ही लस युकेमध्ये देण्यावर बंदी आणण्यात आली आहे. या लसीमुळे मृत झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही कुटुंबे लसीचे साईड इफेक्ट मान्य करावेत अशीही मागणी करत आहेत.