Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:28 AM2021-06-11T09:28:25+5:302021-06-11T09:34:00+5:30
Corona Vaccination: विशेष गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस वाट पाहावी लागणार नाही
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. देशात लसीकरणासाठी प्रामुख्यानं कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर केला जात आहे. त्यातही बहुतांश रुग्णांना कोविशील्ड दिली जात आहे. याच कोविशील्डच्या दोन डोसच्या वेळापत्रकात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
लसीबाबत चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा
कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर आतापर्यंत दोनवेळा वाढवण्यात आला आहे. मात्र आता हेच अंतर कमी करण्यात आलं आहे. काही विशिष्ट गटांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे या गटांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस (१२ ते १६ आठवडे) वाट पाहावी लागणार नाही. या गटातील व्यक्ती २८ दिवसांत दुसरा डोस घेऊ शकतील. दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय केवळ कोविशील्डसाठी घेण्यात आला आहे. कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचं आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
२०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये
कोणाला मिळणार २८ दिवसांत दुसरा डोस?
नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करू इच्छिणारे २८ दिवसांनंतर कोविशील्डचा दुसरा डोस घेऊ शकतात. नोकरी, अभ्यासासाठी परदेशी जाणारे, ऑलिम्पिक टीमचा भाग असणारे कोविशील्डचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेऊ शकतील. त्यांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशील्डची निर्मिती केली जाते. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश कंपनी ऍस्ट्राझेनेकानं कोविशील्डसाठी संशोधन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्डच्या वापरास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोविशील्डची लस घेतलेल्या व्यक्ती जगभरात प्रवास करू शकतात. परदेशी प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्ती २८ दिवसांनंतर कोविशील्डचा दुसरा डोस घेऊ शकतील. मात्र इतरांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.