हिमाचल प्रदेशमध्ये गाय तस्कराची जमावाकडून हत्या
By Admin | Published: October 17, 2015 08:52 AM2015-10-17T08:52:09+5:302015-10-17T10:09:07+5:30
हिमाचल प्रदेशमध्ये एका कथित गाय तस्कराचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
>ऑनलाइन लोकमत
नाहन ( हिमाचल प्रदेश), दि. १७ - बीफ खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या दादरी येथे इखलाख या व्यक्तीला जमावाने मारहाण करून ठार मारल्याच्या घटनेवरून देशभरातील वातावरण तापलेले असतानाच हिमाचल प्रदेशमध्ये एका कथित गाय तस्कराचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
हिमाचलमधील सिरमौर जिल्ह्यात काही नागरिक एका ट्रकमधून पाच गाई व दहा बैल नेत असताना तेथील स्थानिकांनी पाहिले असता, त्यांनी पोलिसांच्या सहाय्याने त्या ट्रकचा पाठलाग केला. पोलिस आपल्या पाठी लागल्याचे लक्षात आल्यावर ट्रकचालकाने तो ट्रक लवासा चौकाजवळ थांबवून काही गाईंना ट्रकच्या बाहेर फेकले. मात्र त्यात एक गाय मृत्यूमुखी पडली तर इतर गाई जखमी झाल्या. हे पाहताच ट्रक तिथेच ट्रकचालक व इतर लोक जंगलात पळून गेले. मात्र पोलिस व स्थानिकांनी त्यांचा जंगलातही पाठलाग केला आणि त्यांना पकडले. स्थानिकांनी त्या तस्करांना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या नोमान या २८ वर्षीय तरूणाचा रुग्णालयातील उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तो उत्तर प्रदेशमधील सहारणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर ट्रकचालक गुलजार (२२), मोहम्मद निशू (३७) सलमान (२०) आणि गुलफाम (२४) अशी अटक करण्यात आलेल्या इतर व्यक्तींची नावे असून त्यांच्याविरोधात प्राण्यांशी क्रूरपणे वागल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.