सोन्याचा अंश असल्यानेच गायीचे दूध पिवळसर, भाजप नेत्याचे तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:59 AM2019-11-06T06:59:34+5:302019-11-06T07:00:01+5:30
भाजप नेत्याचे तर्कट; कुत्र्याचे मांस खाण्याचा बुद्धिवंतांना सल्ला
कोलकाता : सोन्याचा अंश असल्यानेच गायीच्या दुधाचा रंग पिवळसर असतो, असे अजब तर्कट भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी लढविले आहे. केंद्र सरकारने घातलेल्या बंदीचा निषेध करण्यासाठी समाजातील काही बुद्धिवंत अजूनही गोमांस खात असून त्यांनी त्यापेक्षा कुत्र्याचे मांस खावे, असेही तारे घोष यांनी तोडले आहेत.
बर्दवान येथे सोमवारी एका जाहीर सभेत त्यांनी ही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दिलीप घोष म्हणाले की, देशी गायींच्या पाठीवर वाशिंड असते. विदेशी गायींची पाठ वाशिंडाविना व सपाट असते. वाशिंडामध्ये ‘स्वर्णनारी’ असते. जेव्हा त्यावर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्यातून सोने निर्माण होते. त्यामुळेच देशी गायीचे दूध पिवळसर किंवा साधारण सोन्याच्या रंगाचे असते. एखादा केवळ देशी गायीचे दूध पिऊनही नीट जगू शकतो. असे अनेक साधुसंत आहेत की जे केवळ गायीच्या दुधावर जगतात.
दिलीप घोष यांनी सांगितले की, समाजातील सुशिक्षितांपैकी काही लोक रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, गाड्यांवर गोमांसापासून केलेले पदार्थ खातात. त्यांनी फक्त गोमांसच नव्हे तर कुत्र्याचेही मांस खावे. त्यांनी इतरही प्राण्यांचे मांस खायला हरकत नाही. ते प्रकृतीला नक्कीच चांगले असते असे उपरोधिकपणे नमूद करून ते म्हणाले की, कुठल्याही प्राण्याचे मांस खा; पण हे सगळे उद्योग त्या लोकांनी आपापल्या घरात करावेत. गाय ही आमची माता आहे व तिची हत्या करणे हा सामाजिक अपराध आहे, असे आम्हाला वाटते. (वृत्तसंस्था)
पोलिसांनाही धडा शिकवणार
च्दिलीप घोष म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर कारवाई करणार आहे. च्भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात डांबण्यात आले आहे.
च्ही कारवाई व ती करणाऱ्यांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. भाजपच्या पक्षकार्यकर्त्यांचा छळ करणारे पोलीस निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पेन्शनमधून भरपाई म्हणून काही रक्कम कापून घेण्यात येईल.