प्राणवायू घेऊन प्राणवायूच सोडणारा पृथ्वीतलावर गाय एकमेव प्राणी!
By Admin | Published: January 17, 2017 05:17 AM2017-01-17T05:17:43+5:302017-01-17T05:17:43+5:30
श्वास घेताना प्राणवायू घेणारा व श्वास सोडतानाही प्राणवायूच बाहेर सोडणारा गाय हा या पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी आहे
जयपूर : श्वास घेताना प्राणवायू घेणारा व श्वास सोडतानाही प्राणवायूच बाहेर सोडणारा गाय हा या पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी आहे, अशी मुक्ताफळे राजस्थानचे शिक्षण आणि पंचायत राजमंत्री वासुदेव देवनानी यांनी उधळली आहेत.
राज्याच्या शिक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार अक्षयपात्र फौंडेशनने हिंगोनिया गोशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवनानी यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ‘गाय एकमात्र प्राणी है जो आॅक्सिजन ग्रहण करता है और आॅक्सिजनही छोडता है!’
गाईंचे संगोपन व रक्षण करणे का गरजेचे आहे हे विषद करताना देवनानी यांनी गाय या प्राण्याला आणखीही काही महान गुणधर्ण बहाल करून टाकले. सर्दी अणि पडसे यासारखे आजार केवळ गाईच्या सहवासात राहिल्याने बरे होतात, एवढेच सांगून न थांबता, गाईच्या शेणात ‘बी’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते व त्यामुळे किरणोत्साराचे दुष्परिणाम शोषून घेतले जातात, असेही त्यांनी सांगून टाकले.
सजीव प्राणी हवेतील प्राणवायू घेतात व कार्बन डायआॅक्साईड बाहेर सोडतात, हे सर्वमान्य वैज्ञानिक सत्य आहे. किंबहुना सजीव हवेतील प्राणवायूमुळेच जिवंत राहू शकतो व म्हणूनच या वायूला प्राणवायू म्हणतात. या वैज्ञानिक सत्याला गाईच्या बाबतीत खोटे ठरविणारे विधान करताना मंत्री देवनानी यांनी कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांचा दाखला दिला नाही. परंतु गाईचे वैज्ञानिक महत्व समजून घेऊन त्याचा प्रसार करण्याचे काम खास करून तरुण पिढीने करावे, असे त्यांनी आवाहन केले.
देवनानी यांची ही मुक्ताफळे संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या (फाओ) २००६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वैज्ञानिक अहवालास पूर्णपणे छेद देणारे आहे. जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारे १८ टक्के ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ गुरांसह अन्य पाळीव प्राण्यांमुळे उत्सर्जित होतात व हे उत्सर्जनाचे प्रमाण विमानांसह सर्व प्रकारच्या वाहनांमुळे होणाऱ्या ‘ग्रान हाऊस गॅसेस’च्या एकत्रित उत्सर्जनाहून जास्त आहे, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. देवनानी यांची ही विधाने धक्कादायक असली तरी आश्चर्यकारक नाहीत. कारण
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून गाय हे संघ परिवारवाल्यांचे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक अस्त्रही बनले आहे.
>गार्इंच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय
व मंत्री असलेले राजस्थान हे भारतातील एकमेव राज्य आहे.
मंत्री देवनानी यांनी ज्या हिंगोनिया गोशाळेत हे गोमहात्म्य आख्यान लावले त्याच ठिकाणी गेल्या वर्षी जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांत ५०० हून अधिक गाई हेळसांड होऊन मरण पावल्या होत्या. एवढेच नव्हे तर राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या गोशाळांमध्ये गेल्या वर्षभरात ८,१२२ गायी मरण पावल्याची आकडेवारी राज्य सरकारनेच दिली होती.
>500हून अधिक गायींचा मृत्यू जुलै व आॅगस्ट दोन महिन्यांत
>8122गायींचा वर्षभरात मृत्यू