गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 06:11 PM2019-04-23T18:11:39+5:302019-04-23T18:12:23+5:30
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला.
भोपाळ : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एक नवा शोध लावला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या विधानामुळे त्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. गोमुत्रामुळे माणसाचा कॅन्सर बरा होतो असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एका आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
यावेळी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. पंचगव्य म्हणजे गोबर, दही, गोमूत्र अशा गोष्टींपासून बनवलेलं औषध शारिरीक आजारांना बरं करतं. त्याचबरोबर गायच्या चेहऱ्यावरुन हात फिरवल्यानंतर गाईला आणि माणसाला दोघांनाही सुख मिळतं असंही त्यांनी सांगितले. तसेच माझा कॅन्सर त्याचमुळे बरा झाल्याचंही साध्वी यांनी सांगितले.
भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर जोरदार टीका झाली. भाजपानेही त्यांच्या वक्तव्यापासून फारकत घेत साध्वी यांचे ते वैयक्तिक मत होतं असं सांगितलं त्यानंतर साध्वी यांनी करकरेंबद्दल केलेले विधान मागे घेतलं. मालेगाव स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह या प्रमुख आरोपी आहेत. 9 वर्षं या प्रकरणी तुरुंगात राहिल्यानंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनाही कॅन्सर झाला होता आणि आपल्या कॅन्सरवरही आपणच इलाज केला, असेही सांगायला साध्वी विसरल्या नाहीत.
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भव्य रोड शो काढला. या रोड शोमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते हातात मै हिंदू भगवाधारी हू अशा प्रकारचे पोस्टर्स हातात घेतले होते. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या रॅलीत सहभागी झालेले बहुसंख्य कार्यकर्ते भगवे कपडे परिधान करुन आले होते. मध्य प्रदेशच्या राज्यभरातून अनेक साधू साध्वी यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये दाखल झाले होते. या रॅलीमुळे जुन्या भोपाळ शहरात वाहतुक कोंडीचा सामना लोकांना करावा लागला. रोड शोनंतर आयोजित केलेल्या सभेत भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृती रक्षणासाठी साधू-संतांना पुढे येणे गरजेचे आहे. माझ्यावर अनेक अत्याचार झाले. मी प्रत्येक छळाला समोर गेली आहे. विरोधक भगवा दहशतवाद म्हणतात मात्र हिंदुत्व विकासाचा पर्याय आहे असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी सांगितले.