नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:35 IST2025-01-07T06:34:26+5:302025-01-07T06:35:20+5:30
वाहन चालकाचाही मृत्यू, दोन वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला

नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना
बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसचा (आयईडी) सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजता स्फोट घडवून वाहन उडवून दिल्याने त्यातील जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) ८ जवान शहीद झाले. तसेच एक वाहनचालक मरण पावला आहे. ही भीषण घटना सोमवारी कुटरू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अम्बेली गावाजवळ घडली.
सुरक्षा जवान नक्षलविरोधी ऑपरेशननंतर आपल्या स्कॉर्पिओ वाहनाने परतत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. गेल्या दोन वर्षांतील सुरक्षा जवानांवरील नक्षलवाद्यांचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
ही माहिती बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली. याआधी २६ एप्रिल २०२३ रोजी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या ताफ्यातील एक वाहन स्फोटाद्वारे उडवून दिले होते. त्यात १० पोलिस व एका नागरिक चालकाचा मृत्यू झाला होता. सोमवारच्या स्फोटात शहीद झालेले जवान हे डीआरजी दलाचे होते. ही छत्तीसगड राज्यातील पोलिसांची विशेष यंत्रणा आहे.
शहीद झालेले जवान व वाहनचालक यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, बस्तर भागात जवानांच्या मोहिमेमुळे नक्षलवादी निराश झाले आहेत.
चकमकीतील मृत नक्षल्यांची संख्या ५
छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत शनिवारी झालेल्या चकमकीत आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह हाती लागला. त्यामुळे या चकमकीत मरण पावलेल्या नक्षलवाद्यांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.
शहीद जवान
- कोरसा बुधराम
- सोमडू वेंटील
- दुम्मा मडकाम
- बमन सोढी
- हरीश कोर्राम
- पंडरू पोयम
- सुदर्शन वेटी
- सुभरनाथ यादव
गडचिरोलीत अलर्ट
छत्तीसगडमधील भूसुरुंग स्फोट घडवून उडविल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन वर्षांपासून छत्तीसगड आणि गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
२०२४ मधील चकमकी...
- ५ सप्टेंबर : तेलंगणा सीमेवर चकमकीत ६ नक्षलवादी ठार
- ३ सप्टेंबर : दंतेवाडा-विजापूर सीमेवर ९ नक्षलवादी ठार
- १७ जुलै : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक, १२ नक्षलवादी ठार
- १५ जून : अबुझमाडमध्ये
- ८ नक्षलवादी ठार
- ८ जून : अबुझमाड अमदई भागात
- ६ नक्षलवादी ठार
- २३ मे : अबुझमाडमध्ये
- ९ नक्षलवादी ठार
- १० मे : विजापूरमध्ये १२ नक्षलवादी ठार
- २९ एप्रिल : नारायणपूरमध्ये १० नक्षलवादी ठार.
- १५ एप्रिल: कांकेरमध्ये २९ नक्षलवादी ठार
- २ एप्रिल : विजापूरच्या करचोली येथे १३ नक्षली ठार.
- जानेवारी-एप्रिल: छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ३ चकमकीत ४२ नक्षलवादी ठार
वाहनाचा काही भाग झाडाला लटकला
नक्षलवाद्यांनी वाहनाला लक्ष्य करण्यासाठी वापरलेला शक्तिशाली आयईडी ६०-७० किलो वजनाचा होता. तो खूप पूर्वी पेरण्यात आला होता, असा पोलिसांना संशय आहे. भूसुरुंगाचा हा स्फोट एवढा शक्तिशाली होता, की वाहन पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून, वाहनाचा काही भाग जवळच्या झाडाला लटकलेला दिसला. तसेच स्फोटामुळे घटनास्थळी एक मोठा खड्डा तयार झाला असून, तो १० फुटांपेक्षा जास्त खोल आहे, स्फोटाच्या ठिकाणी १५० मीटर लांबीची वायर आढळून आली आहे.
जीवितहानीबद्दल मला व्यक्तिश: खूप दु:ख झाले आहे. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा देशाने निर्धार केला आहे.
-द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती
छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयईडीच्या स्फोटात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री