भाकप नेते दासगुप्ता यांचे निधन; शुक्रवारी अंत्यसंस्कार; पंतप्रधान, उपराष्ट्रपतींची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:10 AM2019-11-01T04:10:54+5:302019-11-01T04:11:00+5:30
दासगुप्ता यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. कामगारांच्या प्रश्नांना संसदेत व संसदेबाहेर आपल्या घणाघाती वक्तृत्वाने वाचा फोडणारे नेते अशी गुरुदास दासगुप्ता यांची ख्याती होती.
कोलकाता : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह सर्व पक्षांंच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दासगुप्ता यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवारी कोलकाता येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दासगुप्ता यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. कामगारांच्या प्रश्नांना संसदेत व संसदेबाहेर आपल्या घणाघाती वक्तृत्वाने वाचा फोडणारे नेते अशी गुरुदास दासगुप्ता यांची ख्याती होती. ते १९८५ सालापासून पाच वेळा खासदार होते. दासगुप्ता १९५० व १९६० च्या दशकात विद्यार्थी चळवळीतून ते सक्रिय झाले. १९६४ साली भाकपमध्ये फूट पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी भाकपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते सरचिटणीस होते.
यूपीए-१मध्ये मोलाची भूमिका
२००४ साली केंद्रात यूपीए-१ सरकार स्थापन करण्यात भाकपचे नेते ए. बी. बर्धन यांच्याबरोबर दासगुप्ता यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी २०१४ पासून लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दासगुप्ता विचारसरणीशी अत्यंत निष्ठावंत असलेले आदर्श नेते होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.