हिंसाचाराविरोधात माकपा, भाजपा एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:28 AM2017-08-01T01:28:53+5:302017-08-01T01:29:02+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजेश नावाच्या कार्यकर्त्याची २९ जुलै रोजी हत्या झाल्यानंतर दोन पक्षांमधील हिंसाचार रोखण्यासाठी आता माकपा, भाजपा एकत्र येत आहेत.
तिरूवनंतपुरम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजेश नावाच्या कार्यकर्त्याची २९ जुलै रोजी हत्या झाल्यानंतर दोन पक्षांमधील हिंसाचार रोखण्यासाठी आता माकपा, भाजपा एकत्र येत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यासाठी ६ आॅगस्ट रोजी तिरूवनंतपुरम येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.
भाजपा, रा. स्व. संघ आणि माकपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित हिंसक घटनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपा व संघ नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, शांतता बैठका तिरूवनंतपुरम, कोट्टायम आणि कन्नूर येथे होतील. अलीकडील हिंसाचाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की, सर्व राजकीय पक्षांमध्ये जिल्हानिहाय बैठक व्हायला हवी. कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी होऊ नये, असे स्पष्ट निर्देश या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात मुख्यमंत्री पिनाराई विजयन पत्रकारांना एका खोलीतून बाहेर जायला सांगत आहेत. याच ठिकाणी या बैठकीचे आयोजन होणार होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोडियारी बालकृष्णन पत्रकार कधी बाहेर पडतात याची वाट पाहताना दिसत आहेत. विजयन यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कुममानाम राजशेखरन, भाजपाचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल आणि आरएसएसचे नेते पी. गोपालकुट्टी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. माकपचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन हेही बैठकीला उपस्थित होते. (वृत्तसंस्था)