रेकीसाठी केकडाला मिळाले १५ हजार रुपये, ठार मारण्याची योजना नव्हती ठाऊक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:42 AM2022-06-11T07:42:37+5:302022-06-11T07:43:01+5:30
मुसेवालाच्या घरी चहा प्याल्यानंतर व सेल्फी घेतल्यानंतर केकडाने कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी बराड याला संपूर्ण माहिती पुरविली होती. याच्या बदल्यात शार्प शूटर्सला आश्रय देणाऱ्या प्रभदीप पब्बीने त्याला १५ हजार रुपये दिले होते.
- बलवंत तक्षक
चंडीगड : गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यापूर्वी त्यांची रेकी करण्याच्या व हल्लेखोरांना माहिती पुरविण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संदीप ऊर्फ केकडा याला १५ हजार रुपये मिळाले होते. मात्र, मुसेवालाची हत्या केली जाईल, हे आपल्याला माहीत नव्हते, असे केकडाने म्हटले आहे. तो हरयाणाच्या सिरसा येथील रहिवासी आहे. पोलीस त्याची आणखी चौकशी करीत आहेत.
मुसेवालाच्या घरी चहा प्याल्यानंतर व सेल्फी घेतल्यानंतर केकडाने कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी बराड याला संपूर्ण माहिती पुरविली होती. याच्या बदल्यात शार्प शूटर्सला आश्रय देणाऱ्या प्रभदीप पब्बीने त्याला १५ हजार रुपये दिले होते. मुसेवालाच्या हत्येच्या दिवशी (२९ मे) गोल्डी बराडबरोबर केकडाची १३ वेळा फोनवर बातचीत झाली होती. मुसेवाला हा गनमॅन व बुलेटप्रूफ गाडीशिवाय जात आहे आणि त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नाही, अशी माहिती केकडा यानेच गोल्डीला पुरविली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी मुसेवालाला घेरून त्याची हत्या केली होती.
सिद्धू मुसेवालाच्या चाहत्याची आत्महत्या
- पंजाबचा लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्याचे दु:ख अनावर होऊन त्याच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. जसविंदर सिंह (२०), असे त्याचे नाव असून, तो मोहाली जिल्ह्यातील डेराबस्सीचा रहिवासी होता.
-मुसेवालाच्या हत्येनंतर जसविंदर हा अस्वस्थ होता. त्याने मुसेवालाचा ८ जून रोजीचा कार्यक्रम लाइव्ह पाहिला होता. तो दिवसभर मुसेवालाचे गाणे ऐकत असे, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीही मुसेवालाच्या एका चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला वाचविण्यात यश आले होते.