कोरोना लशीच्या वितरणाची 'ब्लू प्रिंट' तयार; निवडणूक आयोगाची मदत घेणार सरकार?
By मोरेश्वर येरम | Updated: December 10, 2020 15:00 IST2020-12-10T14:59:03+5:302020-12-10T15:00:23+5:30
देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लशीचा डोस मिळावा यासाठी केंद्र सरकार निवडणूक आयोगाची मदत घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कोरोना लशीच्या वितरणाची 'ब्लू प्रिंट' तयार; निवडणूक आयोगाची मदत घेणार सरकार?
नवी दिल्ली
कोरोनावर मात देणाऱ्या काही लशींचं उत्पादन देशात सुरू आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यात देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लशीच्या वितरणासाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लशीचा डोस मिळावा यासाठी केंद्र सरकार निवडणूक आयोगाची मदत घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लशीच्या वितरणासाठी रणनिती तयार केली जात आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या टप्प्यात कोरोना लस दिली जाऊ शकते. अशावेळी निवडणूक आयोगाकडे देशातील मतदारांची चोख माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या माध्यमातून लस वाटपाचे अभियान राबवले जाऊ शकते.
इतकंच नव्हे, तर सरकार बुथ पातळीवरील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन घराघरापर्यंत पोहोचता येईल. निती आयोगाकडून या संदर्भात एक सविस्तर प्रस्ताव तयार केला जात आहे. निवडणूक आयोगाशी चर्चा करुन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कोरोना लशीची माहिती दिली होती. त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. राज्यांनी त्यांच्याकडील 'कोल्ड स्टोरेज'च्या सुविधेची तयारी करुन ठेवावी आणि सविस्तर अहवाल केंद्राकडे पाठवावा, असं मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी येत्या काही आठवड्यांत लस उपलब्ध होऊ शकते अशी माहिती दिली होती.
देशात सध्या आठ वेगवेगळ्या लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यातील तीन लशी देशांतर्गत तयार केल्या जात आहेत.