भारतात iPhone ची निर्मिती, लवकरच ग्राहकांच्या हाती
By admin | Published: May 18, 2017 04:27 PM2017-05-18T16:27:57+5:302017-05-18T16:27:57+5:30
तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपलने आयफोनचे भारतात प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 18 - तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपलने आयफोनचे भारतात प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल "द एसई"ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूरू येथील प्रकल्पात ही चाचणी घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात अॅसेम्बल झालेला हा आयफोन ग्राहकांच्या हातात पडण्याची शक्यता आहे.
तैवानची विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. आयफोन एसई या मॉडेलच्या जोडणीचे काम बंगळुरु येथे सुरू झाले आहे. या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना देशात निर्मिलेल्या आयफोनचे मॉडेल वापरण्याचा आनंद घेता येणार आहे.
हा फोन भारतात अॅसेम्बल झाल्याने त्याची किंमतही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असली तरीही भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. सध्या काही भारतीय रिसेलर्सकडून या मॉडेलची 320 डॉलरला विक्री केली जाते. मात्र, कंपनीने या किंमतीपेक्षा किमान 100 डॉलरने स्वस्त असावी अशी इच्छा भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आयफोनची मागणी कमी झाल्याने अॅपलकडून हे विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे.