धोनीनं घेतला होता 'भारत बंद'मध्ये सहभाग? जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 11:10 AM2018-09-11T11:10:45+5:302018-09-11T11:13:40+5:30
महेंद्रसिंग धोनीचा पेट्रोल पंपावरील फोटो सोशल मीडियावरील व्हायरल
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काल काँग्रेसनं भारत बंद पुकारला होता. काँग्रेसच्या या बंदला 21 पक्षांनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचापेट्रोल पंपावरील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत धोनीसोबत त्याची पत्नी साक्षीदेखील दिसत आहे. धोनीनंदेखील भारत बंदमध्ये सहभाग घेतला होता, असा दावा केला जात असून हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर होत आहे.
अरुण ठाकूर नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवर हा फोटो अपलोड केला होता. मात्र काही वेळात त्यांनी हा फोटो डिलीट केला. अरुण कुमार शिमल्याचे रहिवासी असून ते हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाचे सदस्य आहेत. ठाकूर यांनी ट्विट केलेला फोटो नीट पाहिल्यास तो भारत बंद दरम्यान काढण्यात आलेला नाही, हे लक्षात येऊ शकेल. कारण ट्विट करण्यात आलेला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो रात्रीच्या वेळी काढण्यात आलेला आहे. तर भारत बंद सोमवारी दिवसभर पाळला गेला. याशिवाय इंटरनेट शोध घेतल्यावरदेखील अशी कोणतीही बातमी उपलब्ध होत नाही.
इंटरनेटवर या फोटोचा शोध घेतल्यास तो ऑगस्ट महिन्यातील असल्याची माहिती मिळते. त्यावेळी धोनी एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी शिमल्याला गेला होता. धोनी त्यावेळी काही वेळ पेट्रोल पंपावर थांबला होता. हा पेट्रोल पंप शिमल्यातील विकास नगरमध्ये आहे. 29 ऑगस्ट रोजी धोनी पेट्रोल पंपावर आल्याची माहिती पेट्रोल पंपाच्या मालकानं दिली. त्यावेळी धोनीसोबत त्याची पत्नी आणि काहीजण होते, असंही त्यांनी सांगितलं.