रवींद्र जडेजाची पत्नी गुजरात निवडणुकीच्या मैदानात; रिवाबाला भाजपकडून मिळाले तिकीट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:35 AM2022-11-10T11:35:54+5:302022-11-10T11:44:33+5:30
Rivaba Ravindra Jadeja : मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे. यातच गुरुवारी भाजपने पहिली यादी जाहीर केली. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना भाजपने जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तीन वर्षांपूर्वी रिवाबा जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत.
गेल्या मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुजरात निवडणुकीसंदर्भात भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीनंतर आता भाजपने गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली आहे. गुजरात भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबालाही तिकीट देण्यात आले आहे. या जागेचे विद्यमान आमदार भाजपचे धर्मेंद्रसिंह जडेजा आहेत, मात्र पक्षाने रिवाबा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
दुसरीकडे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह चुडासामा आगामी विधानसभा विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या सर्वांनी आपला निर्णय पक्षनेतृत्वालाही कळवला आहे. दुसरीकडे, विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीप सिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत एकूण आठ माजी मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.